शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे हल्लेखोरांचा घेतला समाचार | पुढारी

शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे हल्लेखोरांचा घेतला समाचार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला केला. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून अनेक उलट सुलट प्रतिक्रीया उमटत आहेत. या घडलेल्या प्रकारावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करुन या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो असे म्हणत एसटी आंदोलनाचे नेते ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर टिका केली.

फेसबुक पोस्टद्वारे शरद पवार यांनी म्हटले आहे, आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही.

परंतु, गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना जे सांगण्याचा प्रयत्न झाला तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४०-५० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेले नाही. तसेच ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्या प्रश्नांना हातभार लावून सोडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. यावेळी एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आहेत.

शरद पवार

कारण नसतानाही जवळपास काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैवाने काही व्यक्तींना यात आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या आणि तत्सम गोष्टीला जबाबदार आहे. यातून जे नैराश्य आले ते कुठेतरी काढले पाहिजे यासाठी त्यांनी याठिकाणी मला टारगेट करण्याचा प्रयत्न केला.

आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोणी दाखवत असले तर त्या रस्त्याला विरोध करणे हे तुमची, माझी, सगळ्यांची जबाबदारी आहे. आंदोलनाची थोडी माहिती कळताच तातडीने अनेक सहकारी इथे पोहचले ते माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी मला वेगळे सांगण्याची गरज नाही. संकट आले तर आपण सगळे एक आहोत, हेच तुम्ही दाखवून दिले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

या पोस्टद्वारे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानाला चुकीची दिशा देणाऱ्या नेतृत्वावर टिका केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी न जाण्याचे आवाहन देखिल केले. तसेच सदर घटना घडल्यानंतर अनेक कार्यकर्ते, नेते यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीस धावले त्यांचे आभार देखिल या पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी मानले आहे.

Back to top button