यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीच्या गिफ्टनंतर आता केबलमॅन आणि एम ताईंचा उल्लेख ! | पुढारी

यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीच्या गिफ्टनंतर आता केबलमॅन आणि एम ताईंचा उल्लेख !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी दरम्यान सापडलेल्या डायरीमध्ये मातोश्रीला दिलेल्या गिफ्टच्या उल्लेखानंतर आता केबलमॅनच्या नावाने एकूण सव्वा कोटी रुपये आणि एम ताई यांच्या नावाने 50 लाख रुपये देण्यात आल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. या माहितीने राजकीय वर्तुळात पून्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र प्राप्तीकर खात्याने या वृत्ताचे खंडन केले आहे.

प्राप्तीकर खात्याने 25 फेब्रुवारीच्या पहाटेपासून जाधव यांच्या माझगाव येथील घरासह कार्यालये, त्यांचे जवळचे सहकारी, निकटवर्तीय आणि मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार अशा तब्बल 35 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत शोध मोहीम राबविली होती. चार दिवस ही कारवाई सुरु होती. प्राप्तीकर खात्याने या कारवाईत महत्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल दस्तऐवज यासोबतच जाधव यांची एक डायरी प्राप्तीकर खात्याच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये मातोश्रीला दिलेल्या 50 लाखांच्या घड्याळासह गुढीपाडव्याला दिलेले दोन कोटींचे गिफ्ट आणि राहत्या निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी दिलेल्या 10 कोटींच्या रोख रकमेबाबत नोंदी सापडल्या होत्या.

मातोश्रीला दिलेल्या गिफ्टच्या उल्लेखानंतर आता केबल मॅनच्या नावाने 75 लाख, 25 लाख आणि 25 लाख असे एकूण सव्वा कोटी रुपये आणि एम ताई यांच्या नावाने 50 लाख रुपये देण्यात आल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. केबल मॅन नावाने उल्लेख असलेला व्यक्ती हा राज्यातील मंत्र्याशी संबंधीत आणि एम ताई या मुंबई महानगर पालिकेतील नेत्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. त्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्राप्तीकर खात्यातील एका तपास अधिकार्‍याने मात्र या वृत्ताचे खंडण केले आहे.

यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख!

दरम्यान, जाधवांकडे सापडलेल्या डायरीतून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाल्याचे बोलले जाते. मात्र प्राप्तीकर खात्याच्या अधिकार्‍यांनी जाधवांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चलाखीने मातोश्री या शब्दाला बगल देत डायरीतील मातोश्री हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले होते. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. तसेच, माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. मात्र, जाधवांच्या या उत्तराने प्राप्तीकर खात्याचे समाधान झाले नव्हते. त्यातच आणखी दोन नवीन नावे सापडल्याच्या वृत्ताने जाधवांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button