चंद्रकांत पाटील म्‍हणाले, यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीचा उल्लेख, चौकशीतून कोणीही सुटणार नाही | पुढारी

चंद्रकांत पाटील म्‍हणाले, यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीचा उल्लेख, चौकशीतून कोणीही सुटणार नाही

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रीची नोंद आहे, हे मला माहिती नाही; पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि.२७) येथे पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. या यंत्रणांच्या तपासाची आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे आयकर विभागाला यशवंत जाधव यांच्याकडे कसली डायरी सापडली हे सुद्धा माहिती नाही. मात्र एवढी खात्री आहे की, या चौकशीतून कोणीही सुटू शकणार नाही.

चंद्रकांत पाटील म्हणतात भातखळकर यांच्या मागणीची चौकशी व्हावी

मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. यांच्या मागणीचे  चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महापालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणे योग्य नाही. या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. महापालिकेने बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करायला हवे. त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केवळ पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यास जो विरोध केला आहे तो योग्यच आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

 सांगलीत भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पक्षपातीपणे निर्बंध लावले आहेत. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन व्हावे यासाठी त्यांच्या कार्यक्रमाच्या आधीपर्यंतच निर्बंध लावले आहेत. हा पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग आहे. कोल्हापूरमध्येही असे प्रकार चालू आहेत. आठ वर्षांपूर्वीच्या केसेस काढून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जात आहे. पोलिसांनी पक्षपात बंद करावा. हे फार दिवस चालणार नाही. आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भीतीने महाविकास आघाडीचे मंत्री आरोप करत आहेत. भाजप पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

संजय राऊतांवर मला बोलायचे नाही

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत बाेलण्‍यास चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. आपण सामना वृत्तपत्र वाचणे आणि संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे बंद केले आहे, असे ते म्हणाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येण्यास भाजपाचे राज्यभरातील नेते – कार्यकर्ते उत्सूक आहेत. भाजप या मतदारसंघात मतदारांशी थेट संपर्क साधेल आणि विक्रमी मतांनी निवडणूक जिंकेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचलं का? 

Back to top button