मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा | पुढारी

मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत सापडलेल्या भाजप नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी मागितला वेळ आहे.

दरेकर यांनी काल उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करा अशी विनंती केली होती, तसेच अटकेपासून संरक्षण द्या अशी विनंती केली होती. ही विनंती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना अटकपूर्व जामीनासाठी रितसर मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करा असे निर्देश दिले होते.

त्या नुसार आज न्यायाधीश राहूल रोकडे यांच्या समोर प्राथमिक सुनावणी झाली. गेली 20 वर्षे मजूर या प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक बोर्डावर निवडून येणार्‍या प्रविण दरेकर यांच्या विरोधात दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडे केली होती. ही तक्रार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती. विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना नोटीस बजावली आणि मजूर कसे आहात हे सिद्ध करण्यास सांगितले. मात्र दरेकर यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत.

अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यानंतर आपच्या धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button