नागपूर : २०२४ च्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस | पुढारी

नागपूर : २०२४ च्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी २०२४च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्‍वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्‍यक्‍त केला. गोवा विधानसभा निवडणूक विजयानंतर फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, देशात भाजपची शक्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि गोव्यातील सर्व भाजपच्या सदस्यांच्या मेहनतीमुळेच गोव्यात भाजपची एक हाती सत्ता आली आहे. त्यांच्या वतीनेच मी आज हा सत्कार स्वीकारत असल्याचे फडणवीस म्हणाले.

गोव्यात फडणवीस निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपनं एकहाती विजय खेचून आणला त्यामुळे भाजप नेत्यांकडून सध्या त्यांचं जोरदार कौतुक केलं जातंय.

गोव्यातील या विजयानंतर फडणवीस आज पहिल्यांदा नागपुरात आले आहेत. यावेळी विमानतळ ते नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. फडणवीसांचे स्वागत नागपूर विमानतळावर ढोल-तशांच्या गजरामध्ये करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा :

Back to top button