

मुंबई : पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमधील कलगीतुरा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपींग प्रकरणी आरोप करण्यात आले यावरून भाजप नेत्यांनी आंदोलन केले. दरम्यान आज मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यावरूनही आज अधिवेशनामध्ये गोंधळ झाला. यानंतर महाविकास आघाडीकडून आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (mseb)
माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बावनकुळेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २०१४ ते १९ या काळात काळात चंद्रशेखर बावनकुळे ५ वर्षे ऊर्जा मंत्री होते. या काळात झालेल्या सगळ्याच कामांची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारकडून देण्यात आले आहेत. यामुळे २०१४ ते १९ उर्जा खात्यात महावितरणच्या कामांची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. महिन्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना झालेल्या कामांची प्रशासकीय, आर्थिक बाबींची चौकशी करण्यात येईल. महावितरणने mseb)काढण्यात आलेल्या निविदांची किंमत वाढल्या आहेत का, वाढल्या असल्यास त्याची कारणे कोणती, याचबरोबर कामांमध्ये अनियमितता होती का, याची चौकशी ठाकरे सरकार करणार आहे.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महावितरणमध्ये अनेक पायाभूत कामे झाली. मात्र याच कालावधीत महावितरणची थकबाकीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली. बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच गरज होती का, त्या कामांचा लोकांना फायदा झाला का, हे शोधण्याचं काम चौकशी समिती करणार आहे.