

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग : राज्यात खळबळ उडवून देणार्या फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस बजावल्याने भाजप विरुद्ध राज्य सरकार असा नवा सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. आधी फडणवीस यांना बीकेसीतील सायबर विभागाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. नंतर पोलिसांनीच माघार घेतली आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला.
फडणवीस यांनी आपण रविवारी सकाळी 11 वाजता सायबर सेलच्या कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले होते. तसे झाले असते, तर या कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. तो धोका लक्षात घेऊन गुन्हे विभागाचे सहपोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी स्वत: फडणवीस यांना फोन केला आणि तुम्ही सायबर सेलमध्ये येण्याची गरज नाही. आम्हीच आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी येत असल्याचे कळवले. फडणवीस यांनीही पोलिस ठाण्याला जाण्याचा निर्णय रद्द केला.
रविवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करीत दिवसभर चौकशीसाठी आपल्या 'सागर' बंगल्यावर थांबण्याचा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. त्यामुळे 'सागर' बंगल्यावर कोणत्या घडामोडी घडतात, याबाबत उत्सुकता आहे. आघाडी सरकारच्या काळात बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वसुली रॅकेट सुरू झाले. या प्रकरणाची माहिती सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारला देण्यात आली.
मात्र, सरकारने हे प्रकरण दाबले. त्यांनी कारवाई केली असती, तर मला हा विषय समोर आणावा लागला नसता. हे प्रकरण मी मांडल्यानंतर रॅकेटचे संपूर्ण पेनड्राईव्ह, ट्रान्सक्रिप्ट त्याच दिवशी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांना दिली, असे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आपला हा घोटाळा दाबण्यासाठी हा एफआयआर केला आहे. असा हल्लाही त्यांनी चढविला.
12 मार्च 1993 रोजी मुंबईतील बॉम्बस्फोटांतील आरोपींशी आर्थिक व्यवहार करणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे अद्याप मंत्रिमंडळात आहेत, अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.
पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सीआरपीसी 160 ची पोलिसांनी बजावलेली नोटीस म्हणजे तपास कार्यात मदत करणे, असा अर्थ फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितला. मग पोलिसांनी त्यांना प्रश्नावली पाठविली असताना त्याची उत्तरे का दिली नाहीत? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी केला.
आपण विरोधी पक्षनेते आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकरणाची माहिती घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. हा माझा विशेषाधिकार आहे. माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीदेखील आपण चौकशीला सामोरे जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी सादर केलेल्या व्हिडीओची फॉरेन्सिक चाचणी तसेच तांत्रिक चाचणी केली आहे. प्रवीण चव्हाण हे आक्षेप घेणार हे माहीत होते. त्यामुळे आपण आधीच काळजी घेतली. आपण सादर केलेल्या व्हिडीओ क्लिपशिवाय अन्यही क्लिप आहेत. आपण आघाडी सरकारचे हे षडयंत्र बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार राहणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते