गोव्यातील विजयानंतर मुंबईत भाजपकडून फडणवीसांचं जंगी स्वागत, म्हणाले, ‘त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी’ | पुढारी

गोव्यातील विजयानंतर मुंबईत भाजपकडून फडणवीसांचं जंगी स्वागत, म्हणाले, 'त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनंचं काय झालं ते पाहिलं. त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र केली तर नोटापेक्षा कमी आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे. २०२४ मध्ये राज्यात भाजपचं सरकार पहायला मिळेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. गोव्यात भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज शुक्रवारी मुंबईतील भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली.

सिंहगर्जना करुन ते गोव्यात गेले होते. त्यांच्या नेत्याला ९७ मते मिळाली आहेत, असे सांगत आज रात्रीपासून पुन्हा कामाला लागू. कर्तव्याची जाण आहे. शेतकरी आणि अन्य वेगवेगळ्या घटकांसाठी काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामान्य माणसाचा विश्वास आहे. विधानसभा निवडणुकांचा कौल भाजपचा, मोदींचा, कार्यकर्त्यांचा आहे. पण लढाई अजून समाप्त झालेली नाही. आता तर खरी लढाई मुंबईत होईल. मुंबईत भ्रष्टाचाऱ्याचा विरोधात लढायचे आहे. कामाला सुरुवात करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले. त्यांनी चार राज्यांतील भाजपच्या विजयाबद्दल महाराष्ट्रातील आमदार, खासदारांचे आभार मानले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष महाराष्ट्रातून युती करून गोव्याच्या मैदानात उतरले होते. या सर्वांना धोबीपछाड देत भाजपने बहुमत मिळवत सत्ता राखली. गोव्यातील विजयाचा जल्लोष आज शुक्रवारी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित होते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय गोव्याची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीची जबाबदारी प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. यानिमित्ताने गोव्यासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोव्यातील चाळीसही मतदारसंघात त्यांनी दौरे केले होते. दीड ते दोन महिने ते गोव्यात तळ ठोकून होते. पक्षातील अनेक अंतर्गत पेचप्रसंगामध्ये त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली. याविषयी ते म्हणतात, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा विजय गोव्यातील सर्वसामान्य जनतेचा आहे.

चौफेर घोडदौड करीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांवर आपला झेंडा फडकावला आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची ऐतिहासिक मॅच सलग तिसर्‍यांदा जिंकण्याच्या दिशेने खणखणीत ‘चौकार’ मारला.

दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष मात्र ‘पंजाब दा पुत्तर’ ठरला आहे. या पाचही राज्यांत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुन्हा एकदा भाजपच्या एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघाल्याचा कौल मिळाला.

भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतिहास घडवला. लोकसभेवर सर्वाधिक 80 खासदार पाठवणार्‍या या राज्याने गेल्या 37 वर्षांत कोणत्याही पक्षाच्या हाती सलग दुसर्‍यांदा सत्ता कधी दिली नव्हती. ती योगी यांच्या हाती दिली. 2017 साली भगवी वस्त्रे परिधान करणारे योगी मुख्यमंत्रिपदी बसले आणि आता पुढची पाच वर्षे योगींचीच सत्ता उत्तर प्रदेशवर असेल. योगींचा आणखी एक विक्रम म्हणजे 1985 नंतर कोणताही मुख्यमंत्री पुन्हा निवडून आला नव्हता. योगी मात्र सत्ता राखतानाच दणदणीत मतांनी जिंकलेदेखील!.

हे ही वाचा :

Back to top button