वीज कनेक्शन तोडल्यानेच सूरज जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या, फडणवीसांचा गंभीर आरोप | पुढारी

वीज कनेक्शन तोडल्यानेच सूरज जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या, फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून कृषी पंपाची वीज कापणं तत्काळ बंद करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. सरकारच्या धोरणामुळेच सुरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी सूरज जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरुच आहे. सूरज जाधव याचे वीज कनेक्शन तोडले. यामुळे त्याने फेसबुक लाईव्ह करत सरकारवर आरोप करत आत्महत्या केली. सरकारने सूरज जाधवला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. जोपर्यंत वीज जोडणी कापणे बंद होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा फडणवीस यांनी विधिमंडळात आवारात बोलताना दिला.

शेतीत काबाडकष्ट करूनही कर्जाचा डोंगर व कुटुंबाचे हाल संपता संपेना! दारिद्य्रामुळे निराश झालेल्या पंढरपूर तालुक्यातील सूरज रामा जाधव (वय 26) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली होती. मगरवाडी येथील सूरज जाधव याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला. ‘आता पुन्हा शेतकर्‍याचा जन्म नको’, अशी हृदयाला पाझर फोडणारी करूण कहाणी सांगून त्याने विषाचे घोट घेतले.

सरकारला शेतकर्‍यांची काळजीच नाही. शेतकरीही हक्कांसाठी लढत नाहीत. शेतकर्‍याचे आयुष्य नकोच म्हणून मी ते संपवत आहे. पुढचा जन्म मी शेतकरी म्हणून घेणार नाही, अशी ‘दुर्दम्य’ निराशाही त्याने मृत्यूला कवटाळताना आळवली. सूरजने बुधवारी (दि. 2) विष घेतले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. 4) रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. या प्रश्नी आज विरोधकांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Power Women Pudhari Exclusive : महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button