प्रवीण दरेकर, सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश | पुढारी

प्रवीण दरेकर, सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यासह बीडमधील विधान परिषद आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

मुंबई बँकेतून बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल २७ कोटींचे कर्ज वाटप झाल्याचे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात उघडकीस आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि., आष्टी, या कागदोपत्री उद्योगांना कर्ज वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता दिसून आलेली आहे. तसेच सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद असून आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे हितसंबंधित लोकांना तसेत बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करणे, कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत.

कर्ज वाटप करण्यात आले, त्या काळात प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष होते. तसेच बँकेचे वकील, ऑडिटर यांनी सर्च रिपोर्ट न देता, मालमत्तेची शहानिशा न करता, त्यांचा अभिप्राय न घेता हे कर्ज प्रकरण मंजूर करुन २७ कोटी अदा केलेले आहेत. याप्रकरणी दरेकर यांच्यासह बँकेचे इतर पदाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि कर्जदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ

पंचगंगा नदीच्या प्रदूषण पातळीचा वैज्ञानिक आढावा

Back to top button