P M Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदींनी केली युक्रेन राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा
पुढारी ऑनलाईन डेस्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली. ( P M Modi and zelenskyy ) दोघांमध्ये सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या नेत्यांबरोबरील चर्चा कायम ठेवली आहे.
P M Modi and zelenskyy : माेदींनी मानले झेलेंस्कींचे आभार
पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यात आज सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या चर्चेचे मोदी यांनी कौतुक केले. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थींच्य सुटकेसाठी मदत केल्याबाबतही त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचे आभार मानले. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झालं. भारताने युक्रेनमधील नागरिकांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. मात्र युनोमधील मतदानवेळी भारताने अलिप्त भूमिका बजावली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी भारताकडे राजकीय समर्थन मागितले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी योगदान देण्याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ युद्ध समाप्त व्हावे, असे आवाहन केले होते.
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ अधिकार्यांबरोबर अनेक बैठका केल्या आहेत. मागील आठवड्यात ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे. खार्किव्ह आणि सूमी या दोन शहरात अडकेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थी वगळता जवळपास सर्व भारतीयांना युक्रेनमधून परत आणण्यात आले आहे.
रशिया – युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरातील हल्ले आणखी तीव्र केले आहेत. खार्किव्हमध्ये नागरी वस्तींवर हल्ले होत आहेत. आज रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींची चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. आज होणार्या चर्चेत युद्ध विरामावर चर्चा होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
P M Modi and zelenskyy : युक्रेनमध्ये आतापर्यंत ३८ मुलांचा मृत्यू
युद्धात आतापर्यत ३८ मुलांचा मृत्यू झाला आहे, असा दावा युकेनमधील मानवाधिकार आयोगाने केला आहे. ७१ मुले गंभीर जखमी असून त्यांची मृत्यूशी झूंज सुरु आहे, असेही त्या म्हणाल्या.
कीव्हमध्ये जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थी परतणार
मागील काही दिवसांपूर्वी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये जवानांच्या गोळीबारात जखमी झालेला भारतीय विद्यार्थी हरजोत सिंह लवकर भारतात परतणार आहे. जखमी झाल्यानंतर त्याचा पासपोर्टही हरवला होता. आता तो मंगळवार ८ मार्च रोजी भारतात परतणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली.