सातारा: पाच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; कोयना बोटिंगचा प्रस्ताव अडकला लालफितीत | पुढारी

सातारा: पाच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; कोयना बोटिंगचा प्रस्ताव अडकला लालफितीत

सातारा पुढारी वृत्तसेवा:  पर्यटनाशिवाय पर्याय नसलेल्या पाटण तालुक्यात तब्बल 7 वर्षांपासून कोयना जलाशयातील बोटिंग बंद आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटनाचे अक्षरशः कंबरडेच मोडले आहे. अनेकदा बोटिंग सुरू करण्याबाबत आश्वासन दिले जाते. मात्र, आजवर केवळ ‘तारीख पे तारीख’ या व्यतिरिक्त काहीच हाती पडलेले नाही, हे दुर्दैव आहे.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात कोयना विभागात यापूर्वी वर्षानुवर्षे बोटिंग सुरू होते. या बोटिंगमुळे स्थानिक पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणावर गती मिळाली होती. मात्र, सात वर्षांपूर्वी केवळ राजकीय आकस व धरण सुरक्षेचा बागुलबुवा करत येथील बोटिंग बंद करण्यात आले.

वास्तविक कोयना ते तापोळा या तब्बल 67.50 किलोमीटर अंतरावर धरणाचा शिवसागर जलाशय पसरला आहे. धरणाच्या एका बाजूला महाबळेश्वर (तापोळा) या विभागात याच बोटिंगवर सार्वत्रिक पर्यटन खुले असताना कोयना बोटींगलाच बंदी का?
असा संतप्त सवाल आहे.

बोटिंगला ग्रहण लागल्याने याचा दुष्परिणाम स्थानिक विकास व पर्यटनावर झाला आहे. याबाबत आजवर अनेकदा नानाविध प्रकारे मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्यासाठी शासनाच्या गृह, महसूल, जलसंपदा, वन व वन्यजीव आदी संबंधित विभागातील अनागोंदी कारभारामुळे व समन्वयाच्या अभावामुळे बोटिंगचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. तसेच मागील पाच वर्षांपासून केवळ तारीख पे तारीख मिळत आहे.

मागील वर्षी झालेले भूस्खलन आणि अतिवृष्टी यामुळे शेतीचे नुकसान झालेआहे. त्यामुळेच स्थानिकांसह पर्यटन वाढीचा विचार होऊन किमान आता तरी बोटिंगबाबत गांभीर्याने विचार होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चार पिढ्यांनंतरही न्यायाची प्रतीक्षा कायम

कोयना भूमीपुत्रांच्या त्यागावर निम्मा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व प्रकाशमान झाला आहे. राज्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशलाही पाणी मिळाले आहे. मात्र, त्याच भूमीपुत्रांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत केवळ कागदोपत्री घोडी नाचवली जात आहेत. चार पिढ्यांना याचा फटका बसला असून धरणासाठी त्याग करणार्‍या भूमिपुत्रांना न्याय मिळू शकलेला नाही.

Back to top button