‘नेत्यांच्या माहितीसाठी राज्यात इस्रायली स्पायवेअरचा वापर’ | पुढारी

'नेत्यांच्या माहितीसाठी राज्यात इस्रायली स्पायवेअरचा वापर'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची व्यक्‍तिगत माहिती गोळा करण्यासाठी इस्रायली स्पायवेअरचा वापर होत असून विरोधी नेत्यांवर सातत्याने आरोप करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना गोपनीय व व्यक्तिगत माहिती कोठून मिळते याची चौकशी करा, अशी मागणी अ‍ॅड.सतीश उके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेस अ‍ॅड.रवी जाधव उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. सतीश उके म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची कागदपत्रे, गोपनीय व खासगी माहितीची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही माहिती सक्तवसुली संचालनालय (ईडी) व अनेक राष्ट्रीय तपास संस्था यांना पुरवण्याचे काम सोमय्या व व्यवसायाने चार्टंर्ड अकाऊंटंट असलेले उपेकेंद्रांमुळे करत आहेत. यासाठी इस्त्रायली स्पायवेअरचा वापर करीत आहेत. औरंगाबाद, यवतमाळ व नागपूर भागात काम करणारा उपेंद्र मुळे व त्याचे सहकारी यांना ताब्यात घेतल्यास त्याने केलेले सर्व गुन्हे आणि त्याने राजकीय नेत्यांची कागदपत्रे / गोपनीय माहिती कशी चोरली व ती माहिती सोमय्या व ईडीचे अधिकारी यांना कशी दिली, हे समजेल.

या प्रकरणात किती राजकीय नेते मंडळीच्या फाईल त्याने बनविल्या, ती कागदपत्रे सोमय्या व कोणत्या अधिकारी यांनी कुठे कसे वापरल्या. त्यासाठी या सर्वांवर कारवाई होऊन ही माहिती जप्त करणे सोपे होईल. उपेंद्र मुळे हा ईडीचा साक्षीदार आहे. इस्रायली स्पायवेअरचा वापर करून नेत्यांवर सतत पाळत ठेवणार्‍या या टोळीत किती जणांचा सहभाग हे स्पष्ट होऊन त्यांची अधिकृत नावे समोरे येतील, असा दावाही अ‍ॅड. उके यांनी केला.

हेही वाचलत का ?

Back to top button