मुंबई; पुढारी ऑनलाईन
गोव्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असून गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. गोव्यातील नेते सुदीन ढवळीकर, दिगंबर कामत, विजय सरदेसाई यांचे फोन टॅप होत आहेत असे सांगत महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे फोन टॅपिंग घडलं ते गोव्याचे निवडणूक प्रभारी होते, असा अप्रत्यक्ष टोला राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
माझे फोन आताही टॅप होताहेत, असा दावा त्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा १० मार्चनंतर गोव्यात सक्रिय होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधिमंडळाचे काम न होण्यास विरोधक जबाबदार आहेत. विरोधी पक्षाला ठाकरे सरकारला कामच करु द्यायचं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यपालांवर निशाणा साधताना त्यांनी, राज्यपालांना हटवावं हे महाराष्ट्राचं म्हणणं असल्याचे सांगितले.
तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांची वेगवेगळी नावे ठेवत साठ दिवस फोन टॅप केल्याचे प्रकरण गाजत आहे. आता गोव्यातही असाच प्रकार सुरु असल्याचे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकार्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आणि त्याबाबतची गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याची तक्रार करण्यात आली होती.
हे ही वाचा :