फोन टॅपिंग : देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार | पुढारी

फोन टॅपिंग : देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : फोन टॅपिंग च्या गोपनीय अहवाल फुटीची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. ते आमचे मुख्य साक्षीदार आहेत, असा दावा राज्य सरकारने महादंडाधिकारी एस. भाजीपाले यांच्या न्यायालयात केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकार्‍यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आणि त्याबाबतची गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याची तक्रार करण्यात आली होती.

तपास अधिकारी ए.सी.पी. नितीन जाधव यांनी 3 मे ते 23 सप्टेंबरदरम्यान दिल्लीतील गृह सचिवांना ती कागदपत्रे आणि गॅजेट परत देण्यासाठी चार पत्रे पाठवली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी न्यायालयात दिली.

या वेळी न्यायालयाने कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे असल्याचा निष्कर्ष तुम्ही कोणत्या आधारावर काढला आहे, अशी विचारणा केली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मुंबईत गृह सचिवांना कागदपत्रे आणि गॅजेट्स (उपकरणे) दिली असल्याचे वक्तव्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाने तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचा जबाब नोंदवला आहे का, तुमचा दावा सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत का, अशी विचारणा केली. विरोधी पक्षनेते फडणवीस हेच आमचे प्रमुख साक्षीदार आहेत. तेच याबाबत खुलासा करू शकतात, असे मिसार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या याचिकेवर मंगळवारी निकाल दिला जाणार आहे.

Back to top button