डोंबिवली : विधानसभेतील कामकाजात संविधानिक शब्दांचा वापर झाला पाहिजे : विधानसभा उपाध्‍यक्ष झिरवळ | पुढारी

डोंबिवली : विधानसभेतील कामकाजात संविधानिक शब्दांचा वापर झाला पाहिजे : विधानसभा उपाध्‍यक्ष झिरवळ

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा
विधानसभेतील कामकाजात अर्वाच्य भाषा, वर्तणूक यामुळे सर्वोच्च न्यायालयाला नेहमीमध्ये पडावे लागते. यामुळे एक ना एक दिवस सभागृहाचे सार्वभौम अधिकार संपुष्टात येतील, त्यामुळे मी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावून संविधानिक शब्दांचा वापर झाला पाहिजे, अशा सूचना देणार असल्याचे विधानसभा उपाध्‍यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. गोळवली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना, विधानसभा उपसभापती झिरवाळ म्हणाले, मी आता केवळ राष्ट्रवादी पक्षाचा नसून सर्वांचा आहे. सत्ता कोणाची आहे, मुख्यमंत्री कोण आहे? यावर विधानसभेत वाद घालणे चुकीचे आहे. बाहेरचे सर्वसामान्य नागरिक ‘आम्ही तुम्हाला वाद घालण्यासाठी निवडून दिले नाही’ असे सांगत भांडण्यापेक्षा सुधारणा करा असे माझ्याजवळ बोलतात, तेव्हा याचे वाईट वाटते असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्य करत, फडणवीस सारख्या प्रगल्भ नेत्याने श्रेयवादावरून असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे सांगितले. ठाणे शहरात कोणतेही वादाचे राजकारण नसल्याचे सूतोवाच गृहनिर्माण मंत्र्यांनी केले.
पत्रकारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्या वादाबद्दल विचारले असता, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर न देताच कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button