

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटचे सहकारी सुधीर जोशी यांचे गुरुवारी निधन झाले, ते ८१ वर्षाचे होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्ष वाढीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन ते घरी परतले होते. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरीचा श्वास घेतला.
सुधीर जोशी यांनी शिवसेना पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये सुधीर जोशी यांचे नाव जोडले गेले. ते शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून परिचित होते. त्यांनी शिवसेनेच्या कामगार संघटनांच्या वाटचालीत मोठे योगदान दिले.
सुधीर जोशी हे १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले, ते शिवसेनेचे दुसरे महापौर होते. शिवसेनेचे पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही झाले.
सुधीर जोशी यांनी राज्याचे शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली. त्यांनी या खात्यात अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र १९९९ मध्ये प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे लागले. राजकारणातून बाजूला गेले असले तरी सुधीर जोशी यांना शिवसेनेच्या प्रमुख कार्यक्रमात नेहमी मानाचे स्थान असायचे. शिवसेनेचा दसरा मेळावा असो की महत्त्वाचे कार्यक्रम यामध्ये सुधीर जोशी प्रकृती बरी नसली तरी सहभागी होत होते.