

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी गुरुवारी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. पंजाबमधील निवडणुकीपूर्वी व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि वाढती महागाई यामुळे जनता त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. मनमोहन सिंग म्हणाले, साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतर सरकार आपली चूक मान्य करण्याऐवजी सुधारणा करण्याऐवजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना दोष देत आहे.
माजी पंतप्रधान सिंग म्हणाले, "या सरकारचा खोटा राष्ट्रवाद जितका पोकळ आहे तितकाच धोकादायक आहे. त्यांचा राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
एक संदेश जारी करताना मनमोहन सिंग म्हणाले की, मला वाटते पंतप्रधानपदाला विशेष महत्त्व आहे. इतिहासाला दोष देण्यापेक्षा पंतप्रधानांनी सन्मान राखावा. मी 10 वर्षे पंतप्रधान असताना माझ्या कामातून बोललो. जगासमोर देशाची प्रतिष्ठा मी कधीही ढळू दिली नाही. भारताचा अभिमान मी कधीच कमी केला नाही. माझ्यावर कमकुवत, शांत आणि भ्रष्ट असल्याच्या खोट्या आरोपांनंतर भाजप आणि त्यांची बी आणि सी टीम देशासमोर उघड होत आहे, याचे मला निदान समाधान आहे.
वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनची घुसखोरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या त्यांनी सरकारवर केला. डॉ. सिंह म्हणाले, "त्यांना (भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार) आर्थिक धोरणाचे आकलन नाही. हा मुद्दा देशापुरता मर्यादित नाही. हे सरकार परराष्ट्र धोरणातही अपयशी ठरले आहे. चीन आमच्या सीमेवर बसला आहे आणि ते (घुसखोरीचे) प्रयत्न करत आहेत. आणि ते प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, मला आशा आहे की पंतप्रधानांना हे समजले असेल की नेत्यांना जबरदस्तीने मिठी मारून, झुल्यावर झुलून किंवा बिर्याणी खाऊन परराष्ट्र धोरण चालू शकत नाही. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर "बनावट राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी धोरणे" असल्याचा आरोप केला आणि त्यांचे परराष्ट्र धोरण अयशस्वी झाल्याचे सांगितले. 'राजकीय फायद्यासाठी आम्ही कधीही देशाचे विभाजन केले नाही. आम्ही कधीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला नाही. देशाची मान किंवा पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आपण कधीही कमी केली नाही. आज लोकांमध्ये फूट पडली आहे. या सरकारचा खोटा राष्ट्रवाद पोकळ आणि घातक आहे. त्यांचा राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे. घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत.
पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि राज्यातील जनतेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. पंजाबींच्या शौर्याला, देशप्रेमाला आणि बलिदानाला जग सलाम करते, पण एनडीए सरकार त्यावर बोलले नाही. पंजाबमधील एक सच्चा भारतीय म्हणून या सर्व गोष्टींनी मला खूप त्रास दिला.