सांगली जिल्ह्यातील बांधव पंजाबच्या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी सज्ज !

सांगली जिल्ह्यातील बांधव पंजाबच्या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी सज्ज !
Published on
Updated on

विटा; विजय लाळे : पंजाबच्या विधानसभा निवडणूकीत सांगली जिल्ह्यातील विटा, तासगावसह अन्य भागातील गलाई बांधवांच्या मतांना काँग्रेस, भाजपकडून अनन्य साधारण महत्व आले आहे. सध्या पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येथे भाजप, काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दलासह अन्य पक्ष प्रमुख रिंगणात आहेत.

येथे मावळत्या विधानसभेमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र कॅप्टन अमरिंदर यांनी नवा पक्ष स्थापन केल्याने आणि भाजप हातमिळवणी केल्याने पक्षाला पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जंग जंग पछाडावे लागणार आहे. शिरोमणी अकाली दलाला त्यांचा गमावलेला राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मतदार किती प्रमाणात स्विकारणार ? भाजपला कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर गेल्याने किती फायदा होणार ? त्याचे सगळे गणित एक एका मतावर अवलंबून असणार आहे त्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रीयन लोकांची तब्ब्ल १५० ते २०० दुकाने

सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव देशभरात सोन्या-चांदीच्या गाळणीच्या कामानिमित्त विखुरले आहेत. पंजाबमधील अमृतसरमधील गुरू बाजार आणि कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची तब्ब्ल १५० ते २०० दुकाने आहेत. तिथे या लोकांची स्वातंत्र्यपूर्व काळातील जुन्या इमारतीमधील छोट्या दुकानातून ही कामे चालतात. त्यावरून त्यांचे या शहराशी किती जुने नाते असेल याची कल्पना येते. पंजाबचा व्यापारी सोन्या-चांदीचे शुध्दीकरणाचे काम महाराष्ट्रीयन लोकांकडूनच करून घेतो. कारण तेथील व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की हे काम महाराष्ट्रीयन माणूस अतिशय प्रामाणिकपणे करतो.

सांगली जिल्ह्यातील मांजर्डी, गवाण, वेजेगाव, बेणापूर या गावांतील तरुण या व्यवसायात आहेत. वेजेगाव (ता. खानापूर, जि. सांगली) चे नागेश देवकर यांचे या परिसरात मोठे प्रस्थ आहे. आता पोपट यादव हे प्रधान म्हणून ती परंपरा पुढे चालवत आहेत. अशोक जाधव, संजय काशीद, राम देशमुख, प्रशांत घोटकर, संदीप पाटील असे काही प्रमुख लोक या व्यवसायात आहेत.

ह्या लोकांची स्वतःच्या मालकीची घरे व दुकाने इथे आहेत. येथील मातीशी ते इतके एकरूप झाले आहेत की ते दैनंदिन जीवनात पंजाबी भाषेमध्येच बोलतात. ह्या मराठी माणसांनी कामातून इथे जसा व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे तसा परिसरात चांगला दबदबा पण निर्माण केला आहे. त्यांचे मतदान ही इथेच आहे. अमृतसर मधील गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात मराठी लोकांची असोसिएशन आहे. सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत या असोसिएशनचा पाठिंबा मिळावा यासाठी काँग्रेस आणि भाजप कडून प्रयत्न केला होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news