निमित्त पत्रकार परिषद; पण चांदा ते बांदा शक्तीप्रदर्शन संजय राऊत ‘एकटे’ नसल्याचे दाखवण्यासाठी! | पुढारी

निमित्त पत्रकार परिषद; पण चांदा ते बांदा शक्तीप्रदर्शन संजय राऊत 'एकटे' नसल्याचे दाखवण्यासाठी!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपला सळो की पळो करून सोडलेले संजय राऊत ईडीच्या कारवायांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रस्थानी आहेत.

त्याचबरोबर आघाडी सरकारमधील अनेकांनी ईडी सीबीआयचा ससेमीरा लागल्याने तसेच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्टीव्ह झाल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल शिवसेना संजय राऊत यांनी महाराष्ट्र काय आहे ते मंगळवारी सगळ्यांना कळेल. शिवसेना नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलेल. आम्ही खूप सहन केले, आता डोक्यावरून पाणी चाललंय, आता बघाच आम्ही यांना उद्धवस्त केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा भाजपला दिला.

शिवसेनेच्या वतीने संजय राऊत मंगळवारी दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला सेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, मंत्री, आमदार- खासदार उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसारच ही पत्रकार परिषद होत आहे. ही पत्रकार परिषद जनता, भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी. महाराष्ट्र खोटारडेपणाविरोधात लढेल आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देईल. कुणीही उठावे आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत आक्रमक होण्याचे कारण काय ?

संजय राऊत यांचे जवळचे नातेवाईक प्रविण राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील ठेकेदारांची केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. स्वत: राऊत केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आहेत. आघाडी सरकार स्थापण्यात कळीची भूमिका निभावलेले राऊत कठीण काळात एकटे पडल्याचे चित्र आहे. राऊत एकटे नसल्याचे दाखवण्यासाठी उद्याची पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

भाजपचे साडे तीन नेते जेलमध्ये असतील

महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे आणि हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आहे हे लक्षात घ्या. काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असे बोलत आहेत. पण पुढील काही दिवसात भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

राज्यभरातून शिवसैनिकांचा ताफा शिवसेना भवनकडे

आज नाशकातील येथील घोटी टोलनाक्यावरुन शेकोडोंच्या संख्येने शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला आहे. त्यासाठी नाशिकमधून शिवसैनिक राऊतांच्या पाठबळासाठी जात आहेत.

आता कुठे टॉस झाला आहे. सामना अजून बाकी आहे, आधी सामना तर होऊ द्या मग बघू काय ते…
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री

जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी पत्रकार परिषद : अनिल देसाई

शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते, खासदार उपस्थित राहतील. शिवसैनिकही जमतील. आम्ही कोणाला बोलावले नाही, पण शिवसैनिक स्वतः येतील. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, काय काय केले जातेय, कोणावर कसा दबाव टाकला जातोय, यावर उद्या भाष्य केले जाईल. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकारसमोर आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे, असे शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button