वाहन क्षेत्राच्या PLI योजनेमुळे साडेसात लाख लोकांना मिळणार रोजगार | पुढारी

वाहन क्षेत्राच्या PLI योजनेमुळे साडेसात लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वाहन क्षेत्रासाठीच्या उत्पादन आधारित सवलत म्हणजेच PLI (Production Linked Incentive Scheme) योजनेमुळे आगामी काळात साडेसात लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती अवजड उद्योग खात्याचे सचिव अरुण गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. चँपियन ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स अर्थात ओईएम कंपन्यांसाठी पीएलआय योजना राबविली जात आहे. या योजनेमुळे वाहन क्षेत्राच्या उत्पादनात 2 लाख 31 हजार 500 कोटी रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

पीएलआय (PLI) योजनेत आतापर्यंत वीस कंपन्यांनी सहभाग घेतला आहे, या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, सुझुकी, किआ, महिंद्रा यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. योजनेत सामील असलेल्या कंपन्यांनी सुमारे 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे तर सरकारकडून विविध प्रकारच्या सवलतीपोटी 25 हजार 938 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्या वस्तुंचे उत्पादन सध्या देशात होत नाही, अशा वस्तुंच्या उत्पादनाला सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. व्हॅल्यू अ‍ॅडिशनचा 50 टक्के भाग देशातंर्गत उत्पादनाशी निगडीत असला पाहिजे, ही योजनेची प्रमुख अट आहे. मेड इन इंडियाला चालना देण्यासाठी ही अट घालण्यात आली आहे. देशातंर्गत उत्पादनात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा समावेश आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गुजरातमधल्या एबीजी शिपयार्ड कंपनीत 22 हजार 842 कोटींचा घोटाळा | Pudhari Podcast

Back to top button