धुळे : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी आणि भाचीचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी

धुळे : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी आणि भाचीचा तलावात बुडून मृत्यू

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या चिमुकल्या भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाची पाय घसरून पाण्यात पडल्याने या महिलेने पाण्यात उडी टाकली. पण यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नंदाणे गावात शोककळा पसरली आहे. या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील नंदाने येथील सुंदरबाई समाधान होलार (वय २१ ) यांच्याकडे चाळीसगाव तालुक्यातील नागद येथे राहणारी शिवानी आंबा होलार (वय ७) ही आली होती. शिवानी ही होलार यांची भाची आहे.  सुंदरबाई होलार या भाचीला सोबत घेऊन गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतांना जवळ उभी असलेली शिवानी ही पाय घसरून पाण्यात पडली. तिच्याकडे लक्ष गेल्यावर मामी सुंदरबाई हिने शिवानीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघीही पाण्यात बुडाल्या.

यावेळी तलावाजवळ शेतात गुरे चारत असलेल्या आबा भिल याला तलावात दोन जण पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी वस्ती जवळच असल्याने आरडाओरड केला. त्यामुळे नातेवाईक व गावकरी जमा झाले. त्यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघींना मृत घोषित केले.

सुंदरबाईचे तीन वर्षांपूर्वी नंदाणे येथील समाधान होलार याच्याशी लग्न झाले होते. पती हा सोलार वाजंत्री वाजवन्याचे काम करतो. तीन वर्षांनंतर सुंदरबाई या आता गरोदर होत्या. पण त्यांच्या पोटातील होलार परिवाराचा अंश देखील पाण्यात बुडाला. मामीच्या पोटातील गर्भ आणि भाची असा तीन जणांचा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात समाधान छगन होलार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनगीर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा ;

Back to top button