हिजाब प्रकरण : परराज्यातील मुद्द्यांवरून महाराष्ट्रात संघर्ष करू नये : दिलीप वळसे-पाटील | पुढारी

हिजाब प्रकरण : परराज्यातील मुद्द्यांवरून महाराष्ट्रात संघर्ष करू नये : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. परराज्यातील मुद्द्यांवर अनावश्यक संघर्ष झाल्यास समाजात दुही निर्माण होईल. त्यामुळे राज्यात शांतता राखावी, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागरिकांना केलं आहे. दोन्ही बाजूंनी शांतता राखावी. परराज्यातील मुद्द्यावरून संघर्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

तोपर्यंत कर्नाटकात कॉलेजमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी

दरम्यान, कर्नाटकात धार्मिक पोशाखावरून (Karnataka hijab row) सुरु असलेल्या रणकंदनावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश दिलेला नाही. या प्रकरणातील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तोपर्यंत हिजाब, भगव्या शेले परिधान करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

कर्नाटक सरकारने काढलेल्या ड्रेसकोड नियमाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माध्यमांना सुद्धा उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम आदेशाची वाट पाहावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हिजाब प्रकरणावर सुनावणी घेण्याची कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाकडे विनंती

काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हिजाब प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यावर याचिका दाखल करून घेण्याबाबत विचार करता येईल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली. कर्नाटकात मुलींवर दगडफेक करण्यात आली. राज्यात शाळा-महाविद्यालये बंद पडली आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सुरु असलेला खटला आपल्याकडे वर्ग करावा, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

Back to top button