बेळगाव : दुचाकीची दुभाजकाला धडक; दोघे युवक ठार | पुढारी

बेळगाव : दुचाकीची दुभाजकाला धडक; दोघे युवक ठार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा भरधाव दुचाकी दुभाजकाला धडक बसून दोघे जागीच ठार झाले. बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास खानापूर-बेळगाव रोडवर झाडशहापूर येथे हा अपघात घडला. कुमार बसाप्पा कबाडगी (वय 19) व शिवानंद बसवराज कबाडगी (वय 21, दोघेही मूळ रा. शिवापूर, ता. गोकाक, सध्या बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार हा गेल्या तीन महिन्यांपासून कामासाठी बेळगावला आला होता. गेल्या आठवड्यात कुमारचा नातेवाईक तरुण शिवानंद हा देखील बेळगावला त्याच्याकडे आला होता. दोघेही खासगी नोकरी करीत होते. खानापूरला गेलेले हे दोघेजण रात्रीच्या वेळी बेळगावला परतत होते. ते इतके भरधाव होते की, समोरील दुभाजकाचा त्यांना अंदाज आला नाही.

दुचाकीची जोरदार धडक दुभाजकाला बसली. त्यामुळे दुचाकी फरफटत जाऊन दूरवर जाऊन पडली. यामध्ये दुचाकीवरील कुमार व बसाप्पा हे दोघेही उडून जाऊन पडले. कच्चा रस्ता व आजूबाजूला दगड असल्याने एकाचे दगडावर तर दुसर्‍याचे कच्च्या रस्त्यावर डोके आपटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.वडगाव पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह रात्रीच जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. गुरुवारी सकाळी दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून दुपारी ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वडगाव पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर तपास करीत आहेत.

खानापूरला कशासाठी?

हे दोघेजण बेळगावला कामाला होते. परंतु, ते खानापूरला कशासाठी गेले होते व इतक्या रात्री का परतत होते, हे पोलिसांना देखील माहिती नाही. त्यांनी फिर्याददार नातेवाईकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनाही ते तिकडे कशाला गेले होते, हे सांगता आले नाही.

दोघांचाही कपाळमोक्ष

दुभाजकाला बसलेली ही दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी चालक एका बाजूला तर पाठीमागे बसलेला दुसर्‍या बाजूला पडला होता. दोघेही पालथ्या स्थितीतच पडले असून त्यांचा कपाळमोक्ष झाल्याचे दिसून येत होते. दोघांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे दिसून येत होते.

हेही वाचलतं का?

Back to top button