दुगाण्या झाडायला अक्कल लागते काय? मुख्यमंत्र्यांचा सवाल | पुढारी

दुगाण्या झाडायला अक्कल लागते काय? मुख्यमंत्र्यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘प्रश्न विचारायला काय अक्कल लागते’, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यानंतर विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला होता. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागत, ‘दुगाण्या झाडायला अक्कल लागते काय?’, असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. “फुटबॉल हा पायाने खेळायचा असला तरी, त्याला डोके वापरावे लागते. बुद्धीबळ खेळताना जसा विचार करावा लागतो, तसाच फुटबॉल खेळतानाही तो करावा लागतो. फुटबॉल खेळताना अत्यंत वेगाने निर्णय घ्यावे लागतात असे सांगत, दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते? दुगाण्या झाडायच्या तर रोज दुगाण्या झाडत असतो. परंतु त्या दुगाण्या झाडणं वेगळं”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

फुटबॉलमध्ये दरारा तयार व्हावा

“मला फुटबॉलमधले काही कळत नाही. मात्र माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचाही दरारा निर्माण तयार झाला पाहिजे. फुटबॉलमधले जास्त काही कळत नसल्यामुळे आपण उगाच काही अज्ञान दाखवू इच्छित नाही”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button