अखिलेश यादव : "सत्ता येताच ३ महिन्यांत जातींची जनगणना करणार" - पुढारी

अखिलेश यादव : "सत्ता येताच ३ महिन्यांत जातींची जनगणना करणार"

लखनऊ, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जातीय जनगणनेवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “सरकारमध्ये आल्यानंतर तीन महिन्यांच्या आतच जातीय आधारित जनगणना करणार आहोत.” माजी मंत्री दारा सिंह चौहान भाजपला सोडचिठ्ठी देऊन सपामध्ये सामील झाल्यानंतर अखिलेश यादवांनी हे विधान केलं.

पर्यावरण मंत्रिपदाचा राजीवामा देऊन दारा सिंह चौहान आणि भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या अपना दलाचे आमदार डाॅ. आर.के. शर्मा आपल्या समर्थकांसह समाजवादी पक्षात सामील झाले. यावेळी दारा सिंह म्हणाले की, “२०१७ मध्ये आम्ही ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला होता. मात्र मोजक्याच लोकांचा विकास झाला. बाकीच्या लोकांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देण्यात आले.”

“सपा हे माझं जुनं घर आहे. सरकार बदलून पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव हे निवडून येतील. येणाऱ्या दिवसांत सर्व मागास वर्ग आणि दलित समाजाचं संघटन करण्यात येईल. ते लाख प्रयत्न करू देत. पण, हे वादळ आता थांबणार नाहीत. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही”, असंही दारा सिंह चौहान यांनी सांगितले.

यावेळी अखिलेख यादव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “दिल्लीकर्त्यांनी अगोदरच गोरखपूरला पाठविले. त्यांनी फक्त तोडातोडीचे राजकारण केले. आम्ही लोक पाॅझिटिव्ह आणि विकासाचे राजकारण करणार आहोत. भाजप खोटे सर्वे करून काही दाखवू शकती. पण खरेपणा सर्वांना दिसत आहे. मुख्यमंंत्र्यांना कोणाशी काही देणंघेणं नाही”, अशी टीका अखिलेख यादव यांनी भाजपवर केली.

माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून अखिलेश म्हणाले की, “वर्दीमध्ये कोणत्या विचारसरणीचे लोक लपून बसलेले आहेत. या लोकांना वारंवार अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना सरकारकडून बक्षिसी मिळत आहे. पण, ते ज्या मतदारसंघातून लढतील, तेथून त्यांची डिपाॅजिट जप्त होईल”, अशी टीका त्यांनी केली.

पहा व्हिडिओ : १३ वर्षांचा सुशील जपतोय महाराष्ट्राची लोककला

Back to top button