Election Ink Controversy: महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्करचा वापर; मतदारांमध्ये संभ्रम, आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
Maharashtra Municipal Corporation Elections 2026: महानगरपालिका निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यावेळी पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मतदान करून बाहेर पडलेल्या अनेक मतदारांनी बोटावरची शाई सहज निघत असल्याचा अनुभव शेअर केला आहे. काही ठिकाणी नखावरची शाई लगेच पुसली जात असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनीही बोटावर लावलेली शाई ही मार्कर असल्याचे मान्य केले आहे.
महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की, शाईऐवजी मार्कर किट्स राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, असा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरात आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही नियमभंग नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या मार्करच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जयश्री खाडिलकर पांडे यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, “सकाळी मतदान केल्यानंतर डाव्या हाताच्या बोटाला मार्करने शाई लावली. घरी आल्यानंतर ती राहते का हे पाहण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हरने घासले. शाईचा ठिपका राहिला, पण प्रयत्न केला तर तोही निघू शकतो, असे जाणवले.”
या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, दुबार मतदान टाळण्यासाठी वापरली जाणारी शाई इतकी टिकाऊ असावी का नाही, यावर चर्चा सुरू झाली आहे. काही मतदारांनी यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने नागरिकांना आश्वस्त केले आहे की, मतदान प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नाही आणि सर्व नियमांनुसारच कारवाई केली जात आहे. तरीही, बोटावरील शाई सहज निघत असल्याच्या अनुभवांमुळे हा मुद्दा मतदानात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

