केज, पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील एका परित्यक्ता महिलेला आरोपीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केज पोलिस ठाण्यात एका 33 वर्षीय परित्यक्ता महिलेने फिर्याद दिली आहे. पतीशी मदभेद झाल्याने पीडिता आपल्या चार वर्षीय मुलीसह माहेरी रहात होती. तिने पतीसोबतचे भांडण मिटवण्यासाठी आरोपीला विनंती केली. दरम्यान, मध्यस्थी केल्यानंतर आरोपीने पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. दरम्यान, 8 डिसेंबर 2021 रोजी रात्री पीडिता कोविड केंद्रावर कामाला जाण्यासाठी गावातील बस थांब्यावर थांबली होती. यावेळी आरोपी तिथे पांढर्या रंगाची चारचाकी गाडी घेऊन आला. त्याने पीडितेला गाडीत बसून दूर नेले. यावेळी पीडितेने विरोध केला, मात्र आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर पीडितेला परत त्या बसथांब्यावर आणून सोडले. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार केला. यातून परित्यक्ता असलेली पीडिता गरोदर राहिली. यावेळी लग्न करतो म्हणून गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. परंतु लग्न केले नाही. यानंतर पुणे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिला विष प्राशन करून आत्महत्या कर असे म्हणाला. याला कंटाळून पीडितेने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. यानंतर सोमवारी (दि.27) पीडिता ही तिच्या आई- वडिलांसोबत घरी असताना आरोपी, त्याची पत्नी व इतर नातेवाईकांनी लाथा- बुक्क्यांनी तिला मारहाण केली. यानंतर पीडितेने केज पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुध्द फिर्याद
दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत. पीडितेविरुद्ध खंडणीची तक्रार अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करणार्या पीडित महिलेने आपल्या पतीला ब्लॅकमेल करून सुरुवातीला 25 हजार रुपये घेतले. यानंतर वारंवार ब्लॅकमेल करत आजपर्यंत 25 लाख रुपये घेतले असल्याची फिर्याद एका महिलेने केज पोलिस ठाण्यात दिली आहे. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन संबंधित महिला धमकी देत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी देखील केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचलंत का?