औरंगाबाद: उद्योजकाला सव्वापाच लाखांचा गंडा

औरंगाबाद: उद्योजकाला सव्वापाच लाखांचा गंडा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कच्चा माल खरेदी करून उद्योजकाची 5 लाख 26 हजार 692 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सहा वर्षापूर्वी 2016 मध्ये घडला. अनेकदा तगादा लावूनदेखील पैसे मिळत नसल्याने अखेर पोलिसांत धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे तक्रार दिल्यानंतर (जून 2021) तब्बल एका वर्षानंतर आरोपी दाम्पत्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंद्रमा देवेंद्र राजपूत आणि देवेंद्र राजपूत (रा. साई प्रिंटींग, पॅकेजिंग इंडस्ट्रीज, एमआयडीसी, धुळे) अशी आरोपी दाम्पत्यांची नावे आहेत. फिर्यादी अशोक यादवराव बेडसे हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत 1988 पासून बेडसे पल्स कन्व्हर्जन इंडिया ही क्राफ्ट पेपर रोल तयार करण्याची कंपनी चालवितात. त्यांची आठ वर्षापूर्वी राजपूत दाम्पत्याशी ओळख झाली होती. राजपूत हे बेडसेंकडून कच्चा माल म्हणून क्राप्ट पेपर नेत असत. 2015 मध्येही कच्चा माल खरेदी केला होता. त्याचे पैसे दिल्याने बेडसे यांचा विश्वास बसला.

फेब—ुवारी 2016 मध्ये एकदा आणि मार्चमध्ये चार वेळेस, असा 12 लाख 76 हजार 492 रूपयांचा माल खरेदी केला. त्यांनी इंद्रमाच्या पंजाब नॅशनल बँकेचा धनादेश दिला, पण अकाऊंट डॉरमंटमुळे तो धनादेश वटला नाही. त्यावर पैसे देण्याचे आश्वासन दिले. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने बेडसेंनी अखेर 23 जून 2021 रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले असता, राजपूतने 21 जुलै रोजी प्रत्यक्ष येऊन मागील दोन वर्षापासून कंपनी बंद असल्यामुळे पैसे देता आले नाही, परंतु एकाच आठवड्यात संपुर्ण पैसे देतो असे लेखी दिले. त्यानंतर राजपूतने 7 लाख 49 हजार 800 रुपये परत केले. परंतू त्यानंतरचे उर्वरित 5 लाख 26 हजार 692 रुपये देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने अखेर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news