जालना, पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील आरसीसी इन्स्टिट्यूटमध्ये आयआयटीचा क्लास करणाऱ्या जिंतूर येथील चार अल्पवयीन मुलींना रेल्वेस्थानक परिसरात मंगळवारी ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द केले. बॉय फ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी त्या मुली जालना शहरात आल्या होत्या.
व्हॅलेटाइन डे च्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरासह रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विविध महाविद्यालयाच्या परिसरात पेट्रोलिंग दरम्यान प्रेमाचे बीभत्स दर्शन घडविणाऱ्या टवाळखोरांना या पथकाने समज दिली. जवळपास १३ प्रेमवीरांना नोटिसा बजावून त्यांना समज देऊन सोडण्यात आले. पोलिसांच्या पेट्रोलिंगनंतरही अनेक शाळा व महाविद्यालयातील तरुण व तरुणांनी चोरी-चोरी व निर्मनुष्य ठिकाणी जावून प्रेम व्यक्त केले. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांना पाहून प्रेमी युगुलांनी पळ काढला. दरम्यान, नांदेड येथील आरसीसी इन्स्टिट्यूटमध्ये आयआयटीचा क्लास करणाऱ्या जिंतूर येथील चार अल्पवयीन मुली जालना येथे बॉयफ्रेंड सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाल्यानंतर पथकाने या मुलींना रेल्वेस्टेशन परिसरातच ताब्यात घेतले. यामुळे या मुलींचे व्हॅलेन्टाईन डे चे स्वप्न हवेतच विरले. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक आणि अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक रंजना पाटील, सहायक फौजदार रवी जोशी, संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी आदींनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :