औरंगाबाद : साडेतीन हजार कोटी रुपये खर्चूनही कृष्णेचे पाणी दूरच | पुढारी

औरंगाबाद : साडेतीन हजार कोटी रुपये खर्चूनही कृष्णेचे पाणी दूरच

औरंगाबाद; संजय देशपांडे : गेल्या १५ वर्षांत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करूनही कृष्णेचे पाणी अद्याप मराठवाड्यापासून दूरच आहे. जेऊर ते निरा- भीमा जोड बोगद्याचे रखडलेले काम, प्रकल्पाची संकल्प चित्रे मिळण्यात, तसेच कालव्याचे बंदिस्त पाइपलाइनमध्ये रूपांतर करण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी, संथगतीने होणारे भूसंपादन आदी कारणांमुळे उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत कृष्णेचे पाणी येण्यास आणखी पाच वर्षे लागू शकतात.

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे क्षेत्र ८.३९ टक्के आहे. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांचा यात समावेश होतो. कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाण्याचा मराठवाड्यात वापर करण्यास राज्य सरकारने २००१ या वर्षी परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात सात टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यास २००७ हे वर्ष उजाडले. तेव्हापासून सुरू असलेले काम अजूनही प्रलंबित आहे.

आष्टी उपसा सिंचन योजनेस स्थगिती

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन, तर बीड जिल्ह्यात (आष्टी) एक, अशा तीन उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी मराठवाड्यात येणार आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ हजार हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर, असे सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तिन्ही उपसा सिंचन योजनेच्या कामांवर आतापर्यंत २२८८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या १२०० कोटी रुपयांच्या निविदेस राज्य सरकारने स्थगिती दिल्याने अद्याप कामाला मुहूर्त लागलेला नाही.

या आहेत अडचणी

  • नाशिक येथील सीडीओ संस्थेकडून संकल्प चित्रे मिळण्यास कमालीचा विलंब होत आहे. उपसा सिंचन योजना क्र. १ व २ च्या १०२ संकल्प चित्रांपैकी ६९ प्राप्त झाले असून, ३३ अप्राप्त आहेत.
  • जेऊर बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जेऊर व निरा- भीमा जोड बोगद्याचे काम तसेच मीरगव्हाण पंपगृहाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
  • कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी २८२६ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक आहे. यापैकी १३७२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, १४५४ हेक्टर संपादित करणे बाकी आहे.
  • उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाइनचा वापर करण्याचा निर्णय २०१८ या वर्षी घेतला आहे. तिन्ही उपसा सिंचन योजनांच्या कालव्याची लांबी जास्त असल्याने बंदिस्त पाइपलाइनच्या पर्यायाचा फेरविचार होणे गरजेचे आहे.

१३३ गावांना मिळणार लाभ

मराठवाडा-कृष्णा योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यांतील ५४, तसेच बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ४४, अशा १३३ गावांना लाभ होणार आहे. तेथील पाण्याचे दुर्भिक्ष संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

बोगद्यांची कामे अपूर्ण

उद्धट बंधारा हा कृष्णा-मराठवाडा सिचन प्रकल्पासाठी मुख्य स्रोत आहे. 2.67 दलघमी साठवणक्षमता असलेल्या या बंधार्याचा वापर वळण बंधारा म्हणून केला जाणार आहे. येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता मनोज अवलगावकर यांनी सांगितले.

नीरा – भीमा जोड बोगद्याची लांबी 23.80 कि.मी. असून, 16.20 कि.मी. पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. नीरा- भीमा जोड बोगद्याद्वारे उजनी जलाशयातून सात टीएमसी पाण्याचा उपसा केला जाणार आहे. हे पाणी जेऊर बोगद्याद्वारे मीरगव्हाण पंपगृहात आणले जाईल.

गती देणे गरजेचे

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामास वेग देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी देखील त्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यास सात टीएमसी पाणी दिले जात असले, तरी उर्वरित सात टीएमसी पाणी राज्य सरकारने मंजूर करावे.
– शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

 

हेही वाचा : 

 

Back to top button