वाळूज महानगर; पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून टोमॅटो लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळत आहे. टोमॅटोचे दर भडकल्याने परिसरात टोमॅटो चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. टोमॅटो चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहापूर बंजर (ता. गंगापूर) येथील एका शेतकऱ्याने जवळपास २० ते २२ हजार रुपये खर्च करून टोमॅटोच्या पिकात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. (Tomato Price Hike)
तीन महिन्यापूर्वी १० ते १५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज १०० ते १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने वाळूज महानगर परिसरातील आसेगाव, शहापूर बंजर, आंबेगाव, खोजेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. (Tomato Price Hike)
शहापूर बंजर येथील शेतकरी शरद लक्ष्मण रावते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटोचे पीक घेतात. यावर्षी रावते यांनी जून महिन्यात दीड एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. रोप लागवड, औषध फवारणी, बांधणी, मजुरी असा आतापर्यंत एकूण ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च त्यांनी टोमॅटो लागवडीवर केला आहे. आठ- दहा दिवसात त्यांच्या शेतातील टोमॅटो तोडणीला येणार आहेत.
]रात्रीच्या वेळी कोणीतरी त्यांच्या शेतातून कच्चे टोमॅटो चोरून घेऊन जात आहे. टोमॅटो चोरी रोखण्यासाठी शरद रावते यांनी टोमॅटोच्या पिकाच्या मधोमध २० ते २२ हजार रुपये खर्च करून उच्च प्रतीचा सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सायरन तसेच ऑडियो व्हाईसची सुविधा असून हा सीसीटीव्ही कॅमेरा मोबाईलवरून ऑपरेट करता येतो. यामुळे शेतातील टोमॅटो चोरीला आळा बसेल असे सांगत शरद रावते यांनी या वर्षी टोमॅटो लागवडीतून ५ ते ७ लाखाच्या आसपास उत्पन्न मिळेल असे सांगितले.
हेही वाचा;