हिंगोली: एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जण जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार | पुढारी

हिंगोली: एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जण जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पळसोना येथील एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जण हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज (दि.४) काढले आहेत.

जिल्हयातील पोलिस ठाण्यांमधून दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींची माहिती देऊन वारंवार सुचना देऊनही गुन्हेगारी प्रवृत्ती कमी  होत नसणार्‍या आरोपींच्या तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पोलिस ठाण्यांना दिले होते.

त्यानुसार बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी पळसोना येथील पाच जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांची उपाधीक्षक संदीपान शेळके यांच्या पथकाने अधिक चौकशी करून त्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पळसोना येथील सुरतराम हरिसिंग राठोड, पंढरीनाथ सुरतराम राठोड, दयाराम सुरतराम राठोड या एकाच कुटुंबातील तिघांसह इंदरचंद हरसिंग राठोड, प्रेमदास इंदरचंद राठोड यांना हिंगोली जिल्हयातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

त्यांच्या तडीपारीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हयातील आणखी काही गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या तडीपारीचे लवकरच आदेश काढले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा 

Back to top button