पिस्तुलातून सुटली गोळी अन् गेला चिमुकल्याचा बळी!

पिस्तुलातून सुटली गोळी अन् गेला चिमुकल्याचा बळी!

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरीत्या खरेदी केलेला गावठी कट्टा घरी पत्नीला दाखवित असताना त्यातून गोळी सुटली आणि ती त्यांच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली.

मन सुन्न करून टाकणारी ही घटना गंगापूर शहराव २५ ऑगस्टला सायंकाळी घडली होती. गंभीर जखमी चिमुकल्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र ४८ तासांत त्याची मृत्यूशी झुंज संपली. रविवारी (दि. २७) सकाळी ७ वाजता चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. आर्यन राहुल राठोड (२.५ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील राहुल कल्याण राठोड (वय २९) याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ताब्यात घेतले असून त्याने गावठी कट्टा कुठून आणला? हा कट्टा कशासाठी खरेदी केला? यासह विविध प्रश्नांची उकल केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहुल कल्याण राठोड त्याची पत्नी संगीता (दोघे रा. गेवराई, जि. बीड) हे अडीच वर्षांच्या मुलासह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता. या घटनेत आर्यनच्या कपाळात मधोमध गोळी लागली होती. तेव्हापासून तो अत्यवस्थ होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्याची शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून तो घाटीतील अतिदक्षता विभागात होता. त्याचा धोका टळलेला नव्हता. त्याची मृत्यूशी झुंज सुरूच होती. ४८ तासांनंतर अखेर त्याला मृत्यूने गाठले.

आईचा आक्रोश मन हेलावणारा

गोळीबार प्रकरणानंतर आरोपी राहुलला पोलिसांनी अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे जखमी आर्यन जवळ त्याची आई संगीता व इतर नातेवाईक होते. रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देताच संगीता यांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणार होता. हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. याशिवाय मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच परिसर हळहळून गेला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news