संतापजनक! मध्‍य प्रदेशमध्‍ये जमावाकडून दलित तरुणाची हत्‍या, आईला विवस्‍त्र करुन मारहाण




बडोदिया नौनागीर बसस्थानकाजवळ असणारा पीडितेचा घरावर जमावाने हल्‍ला केला. घराची तोडफोड केली.
बडोदिया नौनागीर बसस्थानकाजवळ असणारा पीडितेचा घरावर जमावाने हल्‍ला केला. घराची तोडफोड केली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विनयभंग प्रकरणााची तक्रार ( Daughter's Assault Case )मागे घेण्‍यासाठी जमावाने घरावर हल्‍ला केला. बेदम मारहाण करत तरुणाचा खून केला. यावेळी आपल्‍या मुलाला वाचविण्‍यासाठी गेलेल्‍या आईला विवस्‍त्र करुन मारहाण केली. ही संतापजनक घटना मध्‍य प्रदेश राज्‍यातील सागर जिल्‍ह्यात घडली आहे. गंभीर जखमी असणार्‍या महिलेला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. पोलिसांनी सागर जिल्‍ह्यातील बडोदिया गावातील येथील नऊ आरोपींविरुद्ध खुनासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्‍यान काँग्रेसने भाजप सरकार आणि मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्‍याविरोधात जोरदार हल्‍लाबोल केला आहे.

विनयभंगाची तक्रार मागे घेण्‍यासाठी कुटुंबावर दबाव

या प्रकरणी खून झालेल्‍या तरुणाच्‍या बहिणीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिचा गावातील काही तरुणांनी विनयभंग केला. तिने दिलेल्‍या तक्रारीनंतर संबंधित आरोपींवर गुन्‍हा दाखल झाला. त्‍यांनी ही तक्रार मागे घेण्‍यासाठी कुटुंबावर दबाव आणला होता. विक्रम सिंग, कोमल सिंग, आझाद सिंग आणि इतर लोक घरी होते. त्‍यांनी विनयभंगाची तक्रार मागे घेण्‍यासाठी कुटुंबीयांना धमकी दिली.

पीडितेच्‍या भावाचा खून, आईला विवस्‍त्र करुन मारहाण

बडोदिया नौनागीर बसस्थानकाजवळ असणारा पीडितेचा घरावर जमावाने हल्‍ला केला. घराची तोडफोड केली. भावाला बेदम मारहाण केली. तरुणाची आई बचावासाठी आल्‍यानंतर तिला विवस्‍त्र करुन मारहाण करण्‍यात आली. पीडित तरुणी घटनास्‍थळावरुन पळून जावून जवळ असणार्‍या जंगलात लपून बसल्‍याने तिचा जीव वाचला. जमावाच्‍या हल्‍ल्‍यात तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला. या घटनेत सहभागी आरोपी सरपंच पती व अन्‍य आरोपी फरार आहेत. दहा मागण्यांवर आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तरुणाच्‍या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आठ संशयितांना अटक, फरार आरोपींचा शोध सुरु

या प्रकरणी मुख्य आरोपी विक्रम सिंह ठाकूर (४१), आझाद ठाकूर (३६), इस्लाम खान (३७), गोलू उर्फ ​​सुशील कुमार सोनी (३६), अनिश खान (२८), गोलू उर्फ ​​फरीम खान (२२), अभिषेक रकवार (२८) आणि अरबाज खान, १९, अटक करण्यात आली. हे सर्वजण बडोदिया नोनगर येथील रहिवासी आहेत. पोलीस फरार आरोपी कोमलसिंग ठाकूर आणि अन्‍य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तिघांवर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजीव उईके यांनी दिली.

काँग्रेसचा भाजपवर हल्‍लाबोल

या प्रकरणी काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्‍हटले आहे की, मध्य प्रदेशातील सागर येथे एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गुंडांनी त्याच्या आईवरही हल्‍ला केला. सागर जिल्‍ह्यात संत रविदास मंदिर बांधण्याचे नाटक करणारे पंतप्रधान मध्य प्रदेशात सातत्याने होत असलेल्या दलित-आदिवासी अत्याचाराकडे दुर्लक्ष करत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री केवळ कॅमेरासमोर वंचितांचे पाय धुवून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही खर्गे यांनी केला आहे.

बसपा प्रमुख मायावतींचा भाजप सरकारवर निशाणा

या प्रकरणी बसपा सुप्रीमो मायावती यांनी x (पूर्वीचे ट्विट) करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्‍हटलं आहे की, मध्य प्रदेशातील सागर जिल्‍ह्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतगुरू रविदासजींच्या स्मारकाची मोठ्या थाटामाटात पायाभरणी केली, त्याच भागात त्यांच्या भक्तांसोबत अत्याचार आणि अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. भाजप आणि त्यांच्या सरकारच्‍या दुहेरी चारित्र्याचा हा जिवंत पुरावा आहे. खुरई विधानसभा मतदारसंघात दलित मुलीचा विनयभंग करून तक्रार मागे घेतली नाही म्‍हणून गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यांनी तरुणाच्‍या आईला विवस्त्र करून तिला बेदम मारहाण केली. बहिणीला मारहाण केली आणि घराची मोडतोड केली. असे भयंकर दृश्य भाजपच्या राजवटीत घडत आहे. अशा क्रूर जातीयवादी घटनांचा कोणी कितीही निषेध केला तरी कमी आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये अशा प्रकारच्या आणखी घृणास्पद घटना सातत्याने घडत आहेत, पण भाजप किंवा त्यांचे सरकार त्यांच्या प्रतिबंधासाठी गंभीर दिसत नाही, ही अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि चिंताजनक आहे.

प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली आणि आरोपींचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि हा गुन्हा वादातून झाल्याचा दावा केला. काँग्रेस या घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे प्रदेश सचिव रजनीश अग्रवाल यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, "या प्रकरणी मध्‍य प्रदेशमधील भाजप सरकारने ततकाळ कारवाई करत आरोपींना आटक केली आहे. मात्र यापूर्वी मध्‍य प्रदेशमध्‍ये काँग्रेस सरकारच्‍या कार्यकाळात दलित अत्याचाराच्या प्रकरणांवर कधीच तत्‍काळ कारवाई करण्‍यात आली नव्‍हती."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news