बीड : पावसाचे आगमन लांबल्यास सोयाबीन, कापसाला फटका 

बीड : पावसाचे आगमन लांबल्यास सोयाबीन, कापसाला फटका 
Published on
Updated on
बीड; उदय नागरगोजे : येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. यामुळे पावसाचे आगमन उशीराने होईल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना पिकांमध्ये बदल करावा लागणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास सोयाबीन आणि कापसाला फटका बसणार असून मुग व उडीदाची पेरणीच शक्य होणार नसल्याचे तज्ञांनी सांगितले. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करणे योग्य ठरणार नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागात अवकाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस एखाद्या दुसर्‍या वेळेस हजेरी लावून गायब व्हायचा. यावेळी मात्र या पावसाने मुक्काम ठोकल्याने गारपिट, वादळी वार्‍याचा सामना करावा लागतो आहे. या दरम्यानच मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. अल निनो सक्रिय होणार असल्याने यावर्षी कमी पाऊस पडेल असे काही हवामान तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. तर काहींनी अल निनो असतानाही भारतात चांगला पाऊस पडल्याची उदहारणे पुढे केली आहेत. या चर्चांमध्ये शेतकर्‍यांचा मात्र गोंधळ उडाला आहे.
नेहमीप्रमाणे जूनच्या प्रारंभी पाऊस पडला तर सोयाबीन, कापुस, बाजरी, तूर, मुग, उडीद, मका या पिकांची पेरणी होऊन उत्पादनही चांगले मिळू शकते. परंतु, पाऊस लांबल्यास काय करायचे? अशा स्थितीत शेतकर्‍यांना पिकांमध्ये बदल करावा लागणार आहे. राज्यात बहुतांश भागात सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. पाऊस लांबला तर या प्रमुख पिकांनाच फटका बसणार आहे. 15 जुलैपर्यंत पाऊसच आला नाही तर या पिकांच्या वाढीस पुरेसा वेळ मिळणार नाही.
कापसाची बोंडे पोसणार नाहीत. परिणामी उत्पनात घट होणार हे निश्‍चित. असाच प्रकार मुग आणि उडीदाचाही होणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पाऊस पडला तरच मुग आणि उडीदाचे उत्पादन घेता येऊ शकते. 15 जुलैच्या पुढे पेरणीयोग्य पाऊस आला तर बाजरी, तुर आणि मका या पिकांना प्राधान्य द्यावे लागेल. त्या दृष्टीने शेतकर्‍यांनी तयारी करणे आवश्यक आहे.
एका आठवड्यात किमान 80 मीमी पाऊस झाला तर पेरणी करता येते. त्यापेक्षा कमी पाऊस असल्यास पेरणीचे धाडस करता कामा नये. यावर्षी अल निनोच्या सक्रीयतमुळे पाऊस कमी होईल असे बोलले जात असले तरी यापूर्वी अल निनो सक्रीय असतांना चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे आताच त्याबाबतीत ठामपणे अंदाज बांधणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी हवामान विभागाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करुन नियोजन करायला हवे.
– डॉ.वसंत सुर्यवंशी, कृषी विद्यावेत्ता, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ.
साधारणतः आपल्याकडे कापुस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. याबरोबरच तूर, मका, बाजरी, मुग, उडीदाचीही पेरणी होते. पाऊस लांबल्यास पिकांचे नियोजन करता येऊ शकते. परंतु सुरुवातीला पाऊस पडून खंड पडल्यास शेतकर्‍यांना आर्थिक फ टका बसू शकतो. पावसाच्या आगमनाच्या कालावधीनुसार शेतकर्‍यांनी पिकांची निवड करणे गरजेचे आहे.
– सुर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी, अंबाजोगाई
हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news