परभणी : सेलूत पाणी पेटले: शेतकऱ्यांचा विरोध डावलून ‘दुधना’तून पाणी सोडले

Dudhana dam
Dudhana dam

[author title="श्रीपाद कुलकर्णी" image="http://"][/author]
सेलू : लोअर दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी प्रशासनाने आज (दि. २२) संपूर्ण तयारी केली होती. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सकाळी १० वाजता पाणी सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्त शेकडो शेतकरी यांनी प्रत्यक्ष धरण क्षेत्र परिसरात येऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे धरणाचे दरवाजे तब्बल साडेपाच तासाने उशीर म्हणजे दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी उघडले. प्रशासन व बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांमधील टोकाच्या संघर्षामुळे सेलू तालुक्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिवंत पाणीसाठा शून्य

सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात मागील वर्षी पाऊस कमी झाला आहे. बुधवारी (दि. २२) जलाशयात जिवंत पाणीसाठा ०.११ टक्के म्हणजेच शून्य टक्के इतकाच आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जिवंत साठा ३५ टक्के इतका होता. मृत साठ्यातून नदीपात्रात सहा दरवाजांतून एकूण ५३४६ क्युसेस इतका विसर्ग सोडला. मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुधना काठावरील तहानलेल्या गावांना दिलासा

लोअर दुधना प्रकल्पातील जलसाठ्यातून जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा व परभणी जिल्ह्यातील सेलू अशा तीन मोठ्या शहरासह परतुर तालुक्यातील शेकडो गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येते. मात्र, मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर या गावांचा पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो.

परभणी जिल्ह्यातील दुधना काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे. लोअर दुधना प्रकल्पातून पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले होते. त्यामुळे दुधना काठावरील गावांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे लोअर दुधना प्रकल्पातून उपसा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारे पाणी आणि प्रकल्पावर अवलंबून सर्व पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यावेळी लोअर दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धुळगुंडे, उपअभियंता बाबासाहेब मार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, तहसीलदार दिनेश झापले आदीसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात केला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news