

पूर्णा: येथील पूर्णा-अकोला, पूर्णा-नांदेड या दोन्ही लोहमार्गावर मागील ३ वर्षांपासून काम चालू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाजवळील खड्डेमय पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी जीवघेणा ठरु लागला आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी होवून अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने येथील दोन्ही लोहमार्गावर गत तीन वर्षांपासून उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे पूर्वीचा शहरात जाणारा रस्तागेट बंद करुन दोन्ही लोहमार्गाच्या अकोला रेल्वेलाईनकडून एक पांगरा- पूर्णा तर दुसरा पूर्णा-नांदेड लोहमार्ग पटरीशेजारुन असे दोन पर्यायी रस्ते नव्याने निर्माण केले आहेत. हे रस्ते उड्डाणपूलाचे काम ज्या ठेकेदारांनी घेतले आहे. त्यांनेच उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईपर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम करावयाचे आहे.
परंतु, त्या ठेकेदाराने रस्त्यांचे काम केलेले नाही. नागरिकांतून आवाज उठविला की ? नुसती मलमपट्टी करुन लाखोंची बिले हडप केली जातात. आणि रस्ता मात्र खड्डेमय ठेवतात. याकडे रेल्वेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागही हात वर करतो. हे काम आमच्याकडून नसून रेल्वेकडे आहे, असे सांगितले जाते. या दुहेरी टोलवाटोलवीमुळे वाहतुकीची मात्र त्रेधातिरपीट होत आहे. उसाची वाहने पलटी होवून दुबारा ऊस ट्रॉलीत भरावी लागतात.
संबंधित ठेकेदार या प्रकाराकडे डोळेझाक करतात. हा रस्ता मजबुतीकरण करण्याचे काम रेल्वे ठेकेदाराने एका स्थानिकाला दिले होते. त्याने या रस्त्याचे थातूरमातूर काम करुन निधी हडपल्याची चर्चा होऊ लागली आहे. या खराब रस्त्यावर माटेगाव येथील शेतक-याचे उसाचे वाहन आज (दि. १४) पलटी होऊन मोठे नुकसान झाले आहे. तरी, या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तत्काळ करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा