Parbhani Fraud News | जिवंत बांधकाम कामगारांना मृत दाखवून २३.४० लाखांचा सरकारी घोटाळा

बनावट मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे विविध योजनांचा लाभ; दहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Construction Workers Government Fund Scam
Construction Workers Government Fund Scam AI Photo
Published on
Updated on

Construction Workers Government Fund Scam Parbhani

परभणी : शासनाच्या कल्याणकारी योजनांतील निधीवर डल्ला मारण्यासाठी जिवंत बांधकाम कामगारांनाच कागदोपत्री मृत दाखवून त्यांच्या नावाने लाखो रुपयांचा लाभ उचलल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत उघडकीस आला आहे.

पूर्णा तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या नावाने बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करून स्वतःला वारसदार असल्याचे दाखवत नैसर्गिक मृत्यू लाभ, विधवा अथवा वारस पेन्शन आणि अंत्यसंस्कार सहाय्य योजनांमधून एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा निधी शासनाकडून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी दहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Construction Workers Government Fund Scam
Parbhani news: पूर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्ता बनला दलदलीयुक्त

सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत धानोरा मोत्या आणि गौर (ता. पूर्णा) येथील नोंदणीकृत बांधकाम कामगार जिवंत असतानाही त्यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर संबंधितांना मृत घोषित करून आरोपींनी स्वतःला त्यांचे वारसदार म्हणून दाखविले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांतील आर्थिक लाभ मंजूर करून शासनाची फसवणूक करण्यात आली.

चौकशीत अशा दहा स्वतंत्र प्रकरणांचा पर्दाफाश झाला. प्रत्येक प्रकरणात नैसर्गिक मृत्यू लाभ म्हणून दोन लाख रुपये, विधवा अथवा वारस पेन्शन म्हणून २४ हजार रुपये आणि अंत्यसंस्कार सहाय्य म्हणून १० हजार रुपये, असा प्रत्येकी २ लाख ३४ हजार रुपयांचा लाभ घेण्यात आला. या दहा प्रकरणांतून शासनाच्या तिजोरीतून एकूण २३ लाख ४० हजार रुपये काढण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

Construction Workers Government Fund Scam
Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा

या प्रकरणाचा संशय आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकांकडून मृत्यू प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संबंधित कामगार प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आणि त्यांच्या नावाने सादर करण्यात आलेली मृत्यू प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर लाभार्थ्यांना शासनाची रक्कम परत करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. यापैकी लक्ष्मण बाबुराव टाक यांनी शासनाकडून घेतलेली संपूर्ण रक्कम परत जमा केली. मात्र, उर्वरित संबंधितांनी रक्कम परत न केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी बालाजी रामजी पांचाळ, बालाजी भीमराव कदम, अण्णाराव धोंडीबा भालेराव, माणिक महादू डरांगे, मिराबाई देविदास पांचाळ, मुक्ताबाई नामदेव डाखोरे (रा. धानोरा मोत्या) तसेच दिगंबर व्यंकटी जोगदंड, मुरलीधर नारायण जोगदंड, ज्ञानोबा चुडामणी पारवे आणि सुमनबाई बालाजी पांचाळ (रा. गौर, ता. पूर्णा) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Construction Workers Government Fund Scam
Parbhani news: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेद्वारे सहा वर्षीय बालकाला दिले जीवनदान

या प्रकरणातील बनावट कागदपत्रे तयार करण्यामागील साखळी, त्यात अन्य व्यक्तींचा सहभाग होता का, तसेच अशाच प्रकारे इतर योजनांचाही लाभ घेण्यात आला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news