Purna Drought | दुष्काळाची छाया गडद: सोयाबीन वाळले; सणासुदीत शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले

पावणेदोन महिन्यांपासून पावसाची दडी; खरीप हंगाम हातातून गेल्याने आर्थिक संकट गडद
Purna Soybean Crop Damage
Soybean Crop DamagePudhari
Published on
Updated on

Purna Soybean Crop Damage

आनंद ढोणे

पूर्णा : तालुक्यात मागील पावणेदोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाचा मागमूस नसतानाच दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे शेतातील सोयाबीन पिके अक्षरशः करपून वाळून गेली आहेत. डोळ्यांदेखत पिके हातातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. गतवर्षी अतिवृष्टी आणि यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सलग दोन खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले आहेत.

यंदा कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाही शासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. कोरडा दुष्काळ जाहीर झालेला नाही आणि मागील खरीप हंगामातील पीकविमा नुकसानभरपाईही अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.

Purna Soybean Crop Damage
Crop Loan Purna | पूर्णेत पीक कर्जाच्या जाचक अटींवरून शेतकरी-बँक व्यवस्थापक आमनेसामने

ऐन गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या काळात शेतकऱ्यांसमोर दैनंदिन खर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे. सणासुदीचा किराणा बाजार कसा करायचा, घरातील आवश्यक खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शेतीशिवाय उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

शेतातील सोयाबीन पीकच वाळून गेल्याने आडतेही सोयाबीनवर उचल देण्यास तयार नाहीत. दुसरीकडे, पीक हाती येण्याची शक्यता कमी असल्याने खासगी सावकारांकडूनही उसनवारी किंवा व्याजाने पैसे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सणवार साजरे करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Purna Soybean Crop Damage
Purna Farmer Protest | कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्याचा रास्ता रोको; पोलिसांनी फरफटत नेले बाजूला

महालक्ष्मीच्या बाजारावरही संकट

महालक्ष्मी हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण मानला जातो. या सणानिमित्त घराघरांत विविध गोडधोड, तिखट व तळणीचे पदार्थ केले जातात. दरवर्षी मुगाचे उत्पादन आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक शेतकरी महालक्ष्मी सणाचा बाजार करतात. मात्र यंदा पावसाअभावी मुगाचेही अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे सणासुदीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे.

पाणीपातळी खालावली; चाऱ्याचाही प्रश्न

पावसाने पाठ फिरवल्याने विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.

Purna Soybean Crop Damage
Purna farmers rain crisis : पिकांनी माना टाकल्या; पावसासाठी शेतकऱ्यांचे वरुण राजाकडे साकडे

गतवर्षी अतिवृष्टी आणि यंदा पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडला असताना खरीप हंगाम २०२५ मधील पीकविमा नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित कृषी विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. कोरड्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने वेळीच उपाययोजना आखाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news