

Purna Chudawa Road Farmer Rasta Roko
पूर्णा : तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी सोन्ना येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद कदम यांनी मंगळवारी (दि. ८ ) पूर्णा-चुडावा मुख्य मार्गावरील गोविंदपूर रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. जळून गेलेले सोयाबीन रस्त्यावर टाकून त्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आणि हळद या पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. पिके सुकून वाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत करावी, अशी मागणी कदम यांनी केली.
दरम्यान, रस्ता रोकोमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने चुडावा पोलिसांनी गोविंद कदम यांना रस्त्यावरून बाजूला होण्याची विनंती केली. मात्र, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेत त्यांनी रस्त्यावर ठिय्या कायम ठेवला. बराच वेळ होऊनही रस्ता वाहतुकीसाठी खुला न केल्याने पोलिसांनी अखेर कदम यांना फरफटत नेत रस्त्याच्या बाजूला केले. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी गोविंद कदम यांना चुडावा पोलिस ठाण्यात नेले. सुमारे तासाभरानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
गोविंद कदम हे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलने करत असल्याचे सांगण्यात आले. शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी यापूर्वी अनेकदा आमरण उपोषण केले आहे. तसेच चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठीही त्यांनी पोलिस ठाण्यासमोर उपोषण केले होते. मात्र, या मागणीवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
आता तालुक्यातील पिकांची बिकट अवस्था लक्षात घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी त्यांनी एकट्याने रस्ता रोको करत शासनाचे लक्ष वेधले आहे.