

Purna Farmer Loan Issues
पूर्णा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत पीक कर्ज माफ झाल्यानंतर नव्याने पीक कर्ज मिळविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या जाचक अटींवरून पूर्णा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मंगळवारी (दि. १५) शेतकरी आणि बँक व्यवस्थापक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. दत्तक गावातील शेतकरी एकत्रितपणे बँकेत दाखल झाले. त्यांनी नव्या कर्जासाठी येणाऱ्या अडचणी व्यवस्थापकांसमोर मांडत जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांचा भडिमार केल्याने काही काळ वातावरण तापले. त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सहकार्य करण्याचा मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
पूर्णा शाखेत सध्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यासाठी कर्जप्रकरणांच्या फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, नव्या कर्जासाठी विविध कागदपत्रे अनिवार्य असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक कर्जासाठी सीएससी केंद्रातून ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून फाईल तयार करावी लागत आहे. त्यासोबत इतर बँकांचा सिव्हिल निल रिपोर्ट, संबंधित बँकांचे नोड्यूज प्रमाणपत्र, ऊस व हळद पिकांच्या सिंचनासाठी कृषी पंपाचे वीज वितरण कोटेशन आदी कागदपत्रे मागितली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जमीन कालव्याच्या पाण्यावर सिंचनाखाली असल्यास पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी भरल्याची पावतीही सादर करावी लागत आहे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्जासाठी अर्ज आहे, त्याच शेतकऱ्याच्या नावाचे कृषी पंपाचे वीज कोटेशन आणि पाटबंधारे विभागाची पावती आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. वडील, चुलते किंवा इतर नातेवाइकांच्या नावावरील कागदपत्रे ग्राह्य धरली जात नसल्यानेही अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय सातबारावर नवीन पीकपेरा नोंद असलेली प्रत आदी कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना ती तातडीने उपलब्ध करून घेणे कठीण जात आहे.
महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची थकीत पीक कर्जाची रक्कम माफ झालेल्या शेतकऱ्यांची कर्जखाती शून्य झाली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या अटींमुळे नव्या कर्जासाठी अर्ज करणेच अवघड होत असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळाला असला, तरी नव्या पीक कर्जासाठी कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अटी शिथिल करून कर्जप्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.