

पूर्णा : तालुका परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके आता करपण्याच्या मार्गावर आली आहेत. जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाल्याने सोयाबीन, मूग व उडदाच्या पिकांनी माना टाकल्या असून, फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या निर्णायक अवस्थेतच पावसाचा मोठा खंड पडला आहे.
परिणामी, झाडांवरील फुले व नव्याने लागलेल्या शेंगा गळून पडत असून, पिके सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाचविण्यासाठी आता तातडीने दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. मात्र, पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वरुणराजाकडे साकडे घालत आहेत.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मूग आणि उडदाची पिके सुरुवातीच्या काळात समाधानकारक होती. पिकांची वाढही जोमाने झाली. मात्र, मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. सध्या सोयाबीन, मूग व उडदाला फुलोरा येऊन शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. याच काळात पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु, पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी होत गेला आणि आता शेतजमिनी कोरड्या पडून भेगाळू लागल्या आहेत.
पाण्याअभावी झाडांवरील फुले व नव्याने लागलेल्या शेंगा गळून पडत आहेत. काही ठिकाणी पिकांची पाने कोमेजून गेली असून, उभ्या पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही घट होत आहे. उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचन करून पिके जगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्यात पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस लवकर न झाल्यास खरीप हंगामाबरोबरच पुढील काळातील पाणीटंचाईचे संकटही उभे राहू शकते.
मागील काही दिवसांपासून परिसरात दिवसा कडक ऊन आणि रात्री टिपूर चांदणे, अशी स्थिती आहे. आकाशात ढग जमा होत नसल्याने पावसाची चिन्हेही दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाचा खंड आणखी काही दिवस कायम राहिल्यास कमी कालावधीची पिके पूर्णपणे हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गतवर्षीच्या पीकविम्याची प्रतीक्षा; शेतकरी दुहेरी संकटात एकीकडे यंदाच्या खरीप हंगामावर पावसाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पीकविमा नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. गतवर्षीच्या नुकसानीची पीकविमा भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात असतानाच गतवर्षीच्या अतिवृष्टीची पीकविमा भरपाईही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे उत्पादनाची चिंता आणि आर्थिक अडचण, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
तुषार सिंचनातून पिके वाचविण्याची धडपड
मोजक्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल किंवा विहिरीची सुविधा उपलब्ध आहे, ते तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देऊन ती वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे काही क्षेत्रापुरतेच सिंचन करावे लागत आहे. पावसाचे आणि सिंचनाचे पाणी यामध्ये मोठा फरक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एक चांगला दमदार पाऊस झाला तर संपूर्ण क्षेत्राला ओलावा मिळून पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.