Parbhani News | माखणीतील महिला शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा आदर्श; रेशीम उद्योगाकडे खांबेगावची दमदार वाटचाल

१७ शेतकऱ्यांना तुती लागवडीचे आधुनिक प्रशिक्षण
Organic Farming Parbhani
Organic Farming ParbhaniPudhari
Published on
Updated on

Organic Farming Parbhani

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील माखणी येथील महिला शेतकरी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा स्वीकार करून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करत आहेत. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी करून नैसर्गिक संसाधनांच्या आधारे शेती करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी राबविला आहे. यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून, जमिनीची सुपीकता वाढण्यासह पर्यावरण संवर्धन आणि विषमुक्त अन्नधान्य उत्पादनालाही चालना मिळत आहे.

पूर्णा तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, गट विकास अधिकारी नारायण मिसाळ, उमेद अभियानाचे विकास अधिकारी अश्विन राठोड, मंडळ कृषी अधिकारी बालाजी घाडके, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. गजानन गडदेवदरी, डॉ. दिगंबर पटाईत तसेच महेश गुळभीले, शुभम देशमुख, स्वाती घोडके, द्रौपदी विखे आणि तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी गट विविध सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वीपणे राबवत आहे.

महिला शेतकरी पक्षी थांबे, चिकट सापळे आणि फेरोमोन सापळ्यांच्या साहाय्याने रासायनिक औषधांशिवाय किडींचे नियंत्रण करत आहेत. तसेच निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत, शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला जात आहे. या पद्धतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, मातीची पाणी धारण क्षमता सुधारते आणि पिकांची रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते.

Organic Farming Parbhani
Parbhani News | कानडखेड येथील विकासकामांची जिल्हा परिषद पथकाकडून चौकशी; ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नसून पर्यावरण, माती, पाणी आणि मानवी आरोग्याचे संरक्षण करणारी जीवनशैली असल्याचे महिला शेतकरी सांगतात. रासायनिक अवशेषमुक्त अन्नधान्यामुळे ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळते, तर जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा अधिक सुरक्षित आणि शाश्वत पर्याय ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांत कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घकाळ पावसाचा खंड अशा अस्थिर हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, पिकांवरील ताण कमी होतो आणि उत्पादनात स्थिरता राखण्यास मदत मिळते. त्यामुळे "कमी खर्च – अधिक उत्पादन – निरोगी माती – सुरक्षित अन्न – स्वच्छ पर्यावरण" हे सेंद्रिय शेतीचे सूत्र प्रत्यक्षात साकार होत आहे.

यंदा पाणी फाउंडेशन अंतर्गतही महिला शेतकरी गटाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. जलसंधारण, मृदा संवर्धन, नैसर्गिक शेती आणि पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला असून, गावातील इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यामुळे माखणी गावाची सेंद्रिय शेतीचे आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे.

या उपक्रमात मीरा आवरगंड, सुरेखा आवरगंड, जनाबाई आवरगंड, उज्वला आवरगंड, उर्मिला आवरगंड, सारिका आवरगंड, मीरा सदाशिव, सारिका आंबोरे, यशोदा पल्लमपली यांच्यासह अनेक महिला शेतकरी सक्रिय सहभागी झाल्या आहेत. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, उमेद अभियान, पाणी फाउंडेशन आणि महिला शेतकरी यांच्या समन्वयातून माखणीमध्ये सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक बळकट होत असून, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश परिसरात दिला जात आहे.

Organic Farming Parbhani
Parbhani news: अपेंडिक्स फुटून मृत्यूच्या दाढेतील सहा वर्षीय चिमुकल्याला जीवनदान

सेंद्रिय शेतीचे प्रमुख फायदे

  • रासायनिक खत व कीटकनाशकांवरील खर्चात मोठी बचत.

  • जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढतो.

  • मातीची पाणी धारण क्षमता सुधारून पाण्याची बचत होते.

  • विषमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नधान्याचे उत्पादन मिळते.

  • पर्यावरण प्रदूषण कमी होऊन जैवविविधतेचे संरक्षण होते.

  • बदलत्या हवामानात पिकांची प्रतिकारशक्ती वाढते.

  • दीर्घकालीन दृष्टीने शाश्वत आणि फायदेशीर शेतीला चालना मिळते.

रेशीम उद्योगाकडे खांबेगावची दमदार वाटचाल; १७ शेतकऱ्यांना तुती लागवडीचे आधुनिक प्रशिक्षण

पूर्णा तालुक्यातील खांबेगाव येथे शेतीला पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने तुती लागवड पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीचे शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान १७ निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिकासह देण्यात आले.

गावातील शेतकरी राशेद शेख यांच्या शेतात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा वित्तीय सल्लागार सुनील हटेकर, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट, पूर्णा तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, उपकृषी अधिकारी किरण सातपुते, मंडळ कृषी अधिकारी बालाजी घाडगे, क्षेत्रीय सहाय्यक भंडारी, आबादास भालेराव, कृषी अधिकारी अच्युत तळणीकर, सहाय्यक कृषी अधिकारी दत्ता जोंधळे तसेच जिंतूर येथील प्रगतिशील रेशीम उत्पादक शेतकरी भागवत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Organic Farming Parbhani
Parbhani Somnath Suryawanshi death case|पोलिस कोठडीतील मृत्यू आता लपवता येणार नाहीत, शासनाकडून खंडपीठात सर्वंकष धोरण सादर

प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी तुती लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, शास्त्रशुद्ध लागवड पद्धती, रोपांचे व्यवस्थापन, सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि तुती पिकाच्या निगेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रेशीम उद्योग हा कमी क्षेत्रात अधिक उत्पादन, नियमित उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणारा प्रभावी शेतीपूरक व्यवसाय असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ मिळू शकतो, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे तुती लागवडीबाबत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, खांबेगाव परिसरात रेशीम उद्योगाच्या विस्ताराला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Organic Farming Parbhani
Parbhani Financial Scam: परभणीत एक हजाराच्या आमिषातून सुमारे 7 कोटींचा आर्थिक घोटाळा

कार्यक्रमाला परिसरातील रेशीम उत्पादक व इच्छुक शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन सुरेश शृंगारपुतळे यांनी केले, तर माधव दुधाटे यांनी आभार मानले.

रेशीम उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारा आणि कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन घडवून आणणारा महत्त्वाचा उद्योग मानला जातो. त्यामुळे अशा प्रशिक्षणांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news