Parbhani News | कानडखेड येथील विकासकामांची जिल्हा परिषद पथकाकडून चौकशी; ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

१५वा वित्त आयोग निधी, घरकुल यादी आणि ग्रामपंचायत इमारतीसंदर्भातील आरोपांची पडताळणी; अहवाल वरिष्ठांकडे सादर होणार
Purna Kanadkhed News
जिल्हा परिषद परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.Pudhari
Published on
Updated on

Purna Kanadkhed Zilla Parishad Inquiry

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील कानडखेड क्र. १ येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) आदेशानुसार बुधवारी (दि. २९) अधिकाऱ्यांच्या पथकाने गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी १५वा वित्त आयोग निधी, घरकुल लाभार्थी यादी तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली.

ग्रामस्थांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून विकासकामांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता.

तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी पथकाने गावातील विविध कामांची पाहणी केली. यामध्ये १५व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीची तपासणी करण्यात आली. तसेच विनापरवानगी पाडण्यात आल्याचा आरोप असलेल्या ग्रामपंचायत इमारतीच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी अर्धवट अवस्थेतील बांधकाम आढळून आले.

Purna Kanadkhed News
Parbhani news: अपेंडिक्स फुटून मृत्यूच्या दाढेतील सहा वर्षीय चिमुकल्याला जीवनदान

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी तलाठी भवन उभारले जात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील कार्यादेश (वर्क ऑर्डर) तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

तक्रारीत घरकुल योजनेबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. टिनपत्र्याच्या कच्च्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे ५४ पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही घरांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ती कच्ची असल्याचे आढळल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

Purna Kanadkhed News
Parbhani News | परीक्षा शुल्काच्या अडथळ्यानंतर तीन महिन्यानंतर अखेर परभणीचा शिष्यवृत्ती निकाल जाहीर!

चौकशीदरम्यान ग्रामस्थांनी विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. या संपूर्ण पाहणीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली.

या चौकशी पथकात सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव, विस्तार अधिकारी पी. एन. शिंदे, अभियंता कांबळे तसेच स्थानिक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पुरी यांचा समावेश होता. चौकशीवेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news