

परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे व उपचारांमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अपेंडिक्स फुटल्याने संपूर्ण पोटात संसर्ग (पू) पसरलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेतील या बालकावर रात्री उशिरा तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे बालक पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा भावनिक वातावरणात सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
अजिजिया नगर (परभणी) येथील मोहम्मद हुसेन मुजाहेद इनामदार (वय ६) याला दि. १५ जुलै रोजी तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासणीनंतर शल्यचिकित्सक डॉ. अशोक बंन, डॉ. शहेबाज देशमुख तसेच भूलतज्ज्ञ डॉ. सुनील मोरे यांनी बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला. तातडीने सोनोग्राफी व इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये अपेंडिक्स फुटून संपूर्ण पोटात पू पसरल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णाची प्रकृती अधिकच चिंताजनक होत असल्याने डॉक्टरांनी कोणताही वेळ न दवडता रात्री सुमारे ९ वाजता तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत जोखमीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. त्यानंतर बालकावर अतिदक्षतेने उपचार करण्यात आले. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बालकाची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत गेली आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. बालकाला नवजीवन मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (दि.२८) जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात येऊन वैद्यकीय पथकाचा जाहीर सत्कार केला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सारिका बडे, शल्यचिकित्सक डॉ. अशोक बंन, डॉ. शहेबाज देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. सुनील मोरे, वॉर्ड इन्चार्ज सिस्टर संगीता दीपक क्षीरसागर तसेच सिस्टर उमेसलमा यांचा पेढे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते दिलीपराव देशमुख उपस्थित होते. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार रुग्णाची आई केकशा बेगम मुजाहेद इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नईम इनामदार, डॉ. माजिद कुरेशी, खमर हाश्मी यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.