

ताडकळस: परिसरातील धानोरा काळे, कळगाव, फुलकळस, माखणी , खाबेगाव, महागाव, कळगाववाडी, बलसा बु, एखुरखा, मुबर, माहेर, बानेगाव ,गोळेगाव , देऊळगाव दु, खंडाळा, मजलापुर, निळा आदी. गावातील शेतशिवारात 15 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाला. त्यानंतर चारवेळा अतिवृष्टी झाली.
दरम्यान (दि.5 ऑक्टो.) रोजी दुपारी पाचच्या सुमारास वातावरणात बदल होत ढगांची गर्दी दाटत मेघ गर्जनेसह पाऊसाला सुरुवात झाली. मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीसह छोटे मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. गोदावरी गंगेत वरील धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात विष्णुपुरी प्रकल्पात होत आहे.
सद्यस्थितीत सोयाबीन, कापूस, तुर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी कापलेले सोयाबीन जोरदार पावसाने वाहून गेले आहे. तर उभे असलेल्या सोयाबीन शेंगास अंकुर फुटले आहेत त्या सोबतच शेतकऱ्याचे नगदी पीक असलेले कापूस पीक चांगल्याप्रकारे बोंड फुटून वेचनिस आला होता. परंतु सततच्या जोरदार पावसाने कापसाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असतानाच पावसाच्या जोरदार फटक्यामुळे हता तोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रशासनाने नुकसानीची पाहणी केली आहे, परंतु अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. शेतात काहीच शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे सरसकट क्षेत्राचे नुकसान धरुन शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी ताडकळस परिसरातील शेतकरी करत आहेत. ताडकळस परीसरातील शिवारात गेल्या महिनाभरापासून जोरदार होत असलेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, तुर पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी (दि.25 सप्टेंबर) करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यांचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील , गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर, उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर, तहसीलदार माधव बोथिकार, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यातच काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जे शिल्लक होते तेही गेले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, नैसर्गिक संकटाचा सामना करता करता हतबल झाला आहे. सरकारने नुसत्या घोषणा न करता भरीव नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची दिपावली सण तरी गोड व्हावा , अशी मागणी करण्यात येत आहे.
ॲड. दिनेश काळे शेतकरी (धानोरा काळे, ता.पूर्णा)