

Purna taluka heavy rain soybean crop damage
आनंद ढोणे
पूर्णा: पूर्णा तालुक्यात सोमवारी (दि. ६) पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे.
चुडावा महसूल मंडळात ६८.५ मिमी तर लिमला येथे ६६.३ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली होती. काही उंचवट्याच्या भागात कसाबसा तग धरलेला आणि कापणीस सुरुवात केलेला सोयाबीन आता पुन्हा मुसळधार पावसाने पाण्याखाली जाऊन नासाडीला सामोरा गेला आहे. आधीच पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे आणखी धक्का बसला आहे.
सोयाबीनसोबतच कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांनाही फटका बसला आहे. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जाचक अटींमुळे नुकसान भरपाई मिळणे कठीण होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सरासरी उत्पन्न कमी दाखवले जाण्याची शक्यता असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. म्हणूनच पीक विमा हप्ता भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष कापणी प्रयोग घेऊनच भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
यातच, पीक विमा योजने अंतर्गत रँडम पध्दतीने पीक कापणी उंबरठा उत्पादन अव्हरेज घेण्यासाठी प्रात्यक्षिक गट क्षेत्र निवडीत कृषी, महसूल, ग्रामसेवक, पीक विमा कंपनीकडून गफलत झाली. तर उत्पादन अव्हरेज क्षमता कमी दाखवण्याचा घाट घातला जात असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. ही जाचक अट शिथिल करुन ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला आहे. अशा प्रत्यक शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील सोयाबीन पीक कापणी उंबरठा उत्पादन प्रयोग राबवल्या शिवाय शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही. तेव्हा अशा पध्दतीने पीक कापणी प्रयोग राबवावा, अशी मागणी पीक भरलेल्या शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.