

परभणी : नांदेड येथून अपहरण झालेली 17 वर्षीय मुलगी परभणी रेल्वे स्थानकावर संशयित अवस्थेत फिरताना आढळून आली. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर मुलगी सुखरूप सापडली असून तिला तिच्या आई व नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड रेल्वे पोलिस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्र परभणी येथील पोलिस हवालदार राम बा.कातकडे, महिला पोलिस शिपाई शीतल वाघमारे व महिला पोलिस शिपाई पूजा भरकड हे सोमवारी (दि.2) सायंकाळी 4.30 वाजता परभणी रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग गस्त घालत होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद हालचाली करताना दिसून आली.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती आरती सुरेश कांबळे (वय 17, रा.आंबानगर, सांगवी, ता.जि.नांदेड) असल्याचे समोर आले. पुढील चौकशीत ती नांदेड येथून अपहरण झालेली असल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात पोलिस ठाणे, विमानतळ नांदेड येथे संपर्क साधला असता गुन्हा रजिस्टर क्रमांक 52/2026 कलम 137 (2) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे हे करीत असल्याचे समजले. दरम्यान, विमानतळ पोलिस ठाणे नांदेड येथील पोलिस कॉन्स्टेबल कैलास राठोड तसेच मुलीची आई पूजा सुरेश कांबळे (वय 40, व्यवसाय मजुरी, रा.आंबानगर सावंगी, नांदेड) हे रात्री 8 वाजता दुरक्षेत्र परभणी येथे दाखल झाले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस ठाणे, नांदेड यांच्याकडून सुरू आहे.