

किनवट : विविध गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील दोघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 55 अन्वये ही कारवाई करण्यात आली असून पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
किनवट पोलिस ठाण्याच्या प्रस्ताव क्रमांक 1/2025 नुसार अजीतबाबू बेले (वय 32) व चंद्रकांत ऊर्फ चंदू बाबू बेले (वय 25), दोघे रा. गंगानगर, किनवट यांच्याविरुद्ध मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्यामार्फत सादर करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी याबबत आदेश निर्गमित करून दोघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आदेशानुसार संबंधित इसमांना पोलिस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय या कालावधीत जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
या कारवाईस अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून किनवट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश व्यंकटराव कराड व प्रतिबंधक पथकाने यासाठी परिश्रमपूर्वक पाठपुरावा केला. गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली.